जिल्ह्यातील २११ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:13+5:302021-09-10T04:33:13+5:30
सांगली : जिल्ह्यातील २११ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. कोरोना अजून संपलेला नाही. ...

जिल्ह्यातील २११ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’
सांगली : जिल्ह्यातील २११ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे गणेश मंडळाने शासनाच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला.
ते म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४०४ मंडळांच्या बैठका घेतल्या. गुन्हे दाखल असणाऱ्या ६१२ जणांवर कारवाई करून ७९६ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मिरज-पंढरपूर रस्त्यावर तीन गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दुचाकीसह सायकलचोऱ्या टोळीचाही पर्दाफाश करण्यात आला. तसेच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. १९६ जणांवर कारवाई करण्यात आली.
ते म्हणाले की, शासनाने मंडपात दर्शनाबाबत निर्बंध घातले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मंडळांना स्थानिक प्रशासनाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच गणेशमूर्ती चार फुटांपर्यंत मर्यादित असावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत, यासाठी मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम आयोजित करून गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. वर्गणीच्या पैशांतून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. सीसीटीव्ही लावण्याच्या ठिकाणी, त्याचा दर्जा याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत होईल, असेही गेडाम म्हणाले.
चौकट
साडेतीन हजार पोलीस तैनात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यासाठी २५०० पोलीस, १२०० गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड), दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह २०० अधिकाऱ्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केल्याचे गेडाम यांनी सांगितले.