सांगलीत हॉटेलमध्ये एकाची आत्महत्या
By Admin | Updated: January 13, 2016 23:20 IST2016-01-13T23:20:43+5:302016-01-13T23:20:43+5:30
नैराश्येतून कृत्य : मित्रांनी फसवल्याचा चिठ्ठीत उल्लेख

सांगलीत हॉटेलमध्ये एकाची आत्महत्या
सांगली : शहरातील बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल प्रभूप्रसादमध्ये सुहास श्रीनिवास नाईक (वय ५५, रा. निपालिया, इंदोर) याने बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खोलीत सहापानी चिठ्ठी सापडली असून, त्यात काळ्या जादूच्या नादाला लागून आपली कोट्यवधीची फसवणूक झाल्याने नैराश्य आल्याचे म्हटले आहे. याबाबत शहर पोलिसांत नोंद झाली आहे.
सुहास नाईक गेल्या दोन दिवसांपासून हॉटेल प्रभुप्रसादमध्ये उतरले होते. सकाळी त्यांनी वेटरशी चर्चाही केली होती. पण दुपारनंतर त्यांनी कोणासही बोलाविले नाही. वेटरने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला असता, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब वेटरने हॉटेलचालकास सांगितली. त्यांनी तातडीने खोलीकडे धाव घेऊन दरवाजा तोडला. आत जाऊन पाहिले असता, खोलीतील पंख्याला नाईक यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. हॉटेल चालकाने तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली काढून विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविला.
नाईक यांच्या खोलीची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांना सहापानी चिठ्ठी सापडली. काळ्या जादूच्या नादाला लागल्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्याशिवाय आपला घटस्फोट झाला असून मित्रांनीच आपल्याला लुटल्याचा उल्लेख या चिठ्ठीत आहे. चिठ्ठीत सातजणांचे मोबाईल नंबरही आहेत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली, याचा तपास पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)