रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:44+5:302021-02-05T07:30:44+5:30
यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पात नवीन रेल्वेमार्गासाठी ४१ हजार कोटी, दुहेरीकरणासाठी २६ हजार कोटी, रहदारी सुविधेसाठी पाच हजार कोटी, रेल्वे ...

रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी
यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पात नवीन रेल्वेमार्गासाठी ४१ हजार कोटी, दुहेरीकरणासाठी २६ हजार कोटी, रहदारी सुविधेसाठी पाच हजार कोटी, रेल्वे उड्डाण पूलांसाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू वर्षात सहा हजार किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचे व अडीच हजार किलोमीटर दुहेरीकरण व नवीन रेल्वेमार्गाचे उद्दिष्ट आहे. देशातील ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात उपलब्ध झालेल्या रकमेतून पश्चिम महाराष्ट्रातील नवीन रेल्वेमार्गासाठी भरीव निधी उपलब्ध होण्याची प्रवाशांची अपेक्षा आहे.
गेली चार वर्षे मिरज-पुणे रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. लोणंद-बारामती, कराड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम सुरू होण्यासाठीही निधीची कमतरता आहे. कोल्हापूर-वैभववाडी कराड-चिपळूण या सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वेमार्गाचे काम निधीअभावी रखडल्याचे चित्र आहे. कोल्हापूर व मिरज मॉडेल रेल्वेस्थानक बनविण्यासाठी व मिरज पुणे मार्गावरील स्थानकांची सुधारणा व प्रवासी सुविधांसाठी निधीची गरज आहे. कोल्हापूर व मिरज या रेल्वेस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे, प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर, वायफाय, सरकता जिना या सुविधाही रेल्वे अर्थसंकल्पात उपलब्ध झालेल्या निधीतून पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर-मिरज व मिरज-पंढरपूर मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने रेल्वेगाड्यांची गती वाढणार आहे. मात्र या मार्गावर नवीन रेल्वेगाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.