कुपवाड एमआयडीसीत ट्रकच्या धडकेत एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:47+5:302021-06-30T04:17:47+5:30
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील स्मशानभूमी रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसून मोटारसायकलस्वार दगडू नामदेव कोळी (वय ...

कुपवाड एमआयडीसीत ट्रकच्या धडकेत एकजण जागीच ठार
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील स्मशानभूमी रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसून मोटारसायकलस्वार दगडू नामदेव कोळी (वय ३५, सध्या रा. स्वामी मळा, कुपवाड मूळ गाव आरळी ता. मंगळवेढा जि. सोलापूर) हा तरुण जागीच ठार झाला, तसेच त्यांच्या पाठीमागे बसलेला दत्तात्रय प्रभाकर गवळी (वय २४, रा. स्वामी मळा, कुपवाड मूळ गाव आरळी ता. मंगळवेढा) हा किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालक अनिल अशोक जाधव (रा. गोठण गल्ली, मिरज) यास पाेलिसांनी ताब्यात घेतले.
मंगळवारी सकाळी ट्रक (क्र. एमएच ११ एम ६७१४) हा एमआयडीसीकडून कुपवाडकडे भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी एमआयडीसीतील एका पेट्रोल पंपासमोरून मोटारसायकल (क्र. एमएच १३ डीडी ७४८३) घेऊन दगडू कोळी हा दत्तात्रय गवळी याच्यासह स्वामी मळ्याकडे जात होता. यावेळी ट्रकची जोरदार धडक बसून दगडू कोळी रस्त्यावर पडला. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला दत्तात्रय गवळी हा किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालक अनिल जाधव यास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत जखमी दत्तात्रय गवळी यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार राजू बोंद्रे अधिक तपास करीत आहेत.