हिवरेतील मारहाणीत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:25+5:302021-06-10T04:19:25+5:30
फोटो-०९संख२ फोटो ओळ : हिवरे (ता.जत) येथील आनंदा शिंदे यांचा मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा. यासाठी नातेवाइकांनी जत ...

हिवरेतील मारहाणीत एकाचा मृत्यू
फोटो-०९संख२
फोटो ओळ : हिवरे (ता.जत) येथील आनंदा शिंदे यांचा मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा. यासाठी नातेवाइकांनी जत पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : हिवरे (ता. जत) येथे किरकोळ कारणावरून सात जणांनी मिळून घरात घुसून मारहाण केली. २२ मेरोजी झालेल्या मारहाणीत आनंदा नामदेव शिंदे यांचा उपचारादरम्यान सहा जून रोजी मृत्यू झाला. आनंदा शिंदे यांच्या मृत्यूस मारहाण करणारे जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आनंदा शिंदे यांच्या नातेवाइकांनी जत पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले.
अखेर जत पोलिसांनी कारवाईबाबत आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले.
हिवरे येथील आनंदा नामदेव शिंदे यांच्या शेतात सदाशिव ईश्वर शिंदे, बिरू शंकर शिंदे यांनी जाणूनबुजून ट्रॅक्टर घालून उभ्या पिकाचे नुकसान केले. त्याबाबत आनंदा यांनी त्यांना विचारणा केली असता शाब्दिक बाचाबाची झाली. २२ मे रोजी आनंदा शिंदे यांनी जाब विचारल्याचा राग मनात धरून दुपारी दोन वाजता दगडू कृष्णा शिंदे, दशरथ कृष्णा शिंदे, सदाशिव ईश्वर शिंदे, बिरू शंकर शिंदे, विष्णू भाऊसाहेब शिंदे, राजू विठ्ठल शिंदे, विजय अशोक शिंदे यांनी आनंदा शिंदे यांच्या घरात शिरून त्यांना जोरदार मारहाण केली.
मारहाणीत आनंदा शिंदे यांच्या डोक्याला, हाताला जबर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सहा जून रोजी उपचारादरम्यान आनंदा शिंदे यांचा मृत्यू झाला. आनंदा शिंदे यांचा मृत्यू जबर मारहाणीत झाला असून मारहाण करणाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा. यासाठी मंगळवारी आनंदा शिंदे यांच्या नातेवाइकांनी जत पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करत उपोषण सुरू केले.
या आंदोलनाची पोलीस प्रशासनाने दखल घेत आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करू. अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.