शंभर टक्के शिक्षकांचे लसीकरण, कोरोना टेस्टिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:23+5:302021-07-17T04:21:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या ९०८ शाळा असून, त्यापैकी केवळ २० शाळा पहिल्या दिवशी सुरू ...

शंभर टक्के शिक्षकांचे लसीकरण, कोरोना टेस्टिंग!
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या ९०८ शाळा असून, त्यापैकी केवळ २० शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या आहेत. या शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असून, चाचणी करूनच शाळेत हजेरी लावली आहे. जिल्ह्यात केवळ २.२० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. साडेचार महिन्यानंतर शाळेत उपस्थित राहता आल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. या आदेशानंतर जिल्ह्यातील केवळ २० शाळांनी वर्ग सुरू केले आहेत. यामध्ये तासगाव तालुक्यातील ३, खानापूर ६, कवठेमहांकाळ ६, जत तालुक्यातील ५ शाळांचा समावेश आहे. उर्वरित ८८८ शाळांनी कोरोना रुग्ण असल्याचे कारण देत शाळा बंद ठेवल्या आहेत. यामुळे शासनाने परवानगी देऊनही जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ४३१ विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मात्र दिले जात आहे. काही गावांमध्ये शिक्षक शाळा सुरू करण्यास तयार आहेत, पालकांचीही सहमती आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने शालेय समित्या, सरपंचांनी शाळा सुरु करण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळेही काही शाळा बंदच राहिल्या आहेत.
कोट
आमच्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेतली आहे. तसेच सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत. विद्यार्थ्यांचीही चांगली उपस्थिती आहे. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करुन वर्ग सुरू केले आहेत. याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे.
- संतोष नाईक, मुख्याध्यापक, अगस्ती विद्यालय, ऐनवाडी, ता. खानापूर.
कोट
कोरोना प्रतिबंधक लस सर्व शिक्षकांनी घेतली आहे. कोरोना तपासणीही केली आहे. शासनाच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करूनच शाळा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासूनच शाळेत दाखल करुन घेतले जात आहे.
- संजय माळी, वेणुताई चव्हाण विद्यालय, खानापृर
कोट
शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी सुरु झालेल्या शाळांमधील शिक्षकांनी लस घेतली आहे. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणारेच शाळेत हजर झाले आहेत.
- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, सांगली.
चौकट
पहिल्या दिवशी २० शाळा उघडल्या
जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या ९०८ शाळा असून, त्यापैकी केवळ २० शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये १५८९ विद्यार्थी उपस्थित होते. उर्वरित ८८८ शाळा बंद असून, एक लाख ४७ हजार ४३१ विद्यार्थी अनुपस्थित होते. या गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या असल्याची कारणे शाळांनी दिली आहेत.
चौकट
पहिल्या दिवशी १.०८ टक्के विद्यार्थ्यांचा ‘एक साथ नमस्ते!’
विद्यार्थी संख्या
आठवी ३७६
नववी १४६
दहावी ६८३
अकरावी ००
बारावी ३८४
एकूण १५८९