सांगलीत जमावाच्या मारहाणीनंतर एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:54+5:302021-05-03T04:21:54+5:30
सांगली : लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबांत झालेल्या मारहाणीनंतर एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सिराज बाबासाहेब आत्तार (वय ३५, ...

सांगलीत जमावाच्या मारहाणीनंतर एकाचा मृत्यू
सांगली : लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबांत झालेल्या मारहाणीनंतर एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सिराज बाबासाहेब आत्तार (वय ३५, रा. गवळी गल्ली, पेठभाग, सांगली) असे मृताचे नाव आहे. शहरातील गवळी गल्ली येथे शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी शहर पाेलिसात सातजणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत आयुब सय्यद हसन सय्यद (वय ५३, रा. शिवशंभो चौक, सांगली) याच्यासह सातजणांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत सिराज आत्तार हे गवळी गल्ली परिसरात राहण्यास होते. त्यांच्या शेजारीच त्यांचे भाऊही राहण्यास आहेत. टीव्ही दुरुस्तीचे काम करणारे सिराज यांना दोन मुली आहेत. शनिवारी सायंकाळी सिराजचा भाऊ समीर यांचा मुलगा रिहान हा खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी आयुब सय्यद याचा मुलगा अरिष ऊर्फ मुस्तकीम हा पण तेथे किक्रेट खेळण्यासाठी आला होता. यावेळी एकमेकांना शिवीगाळ केल्याच्या समजातून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे रिहान हा रडत घरी आला. त्यातून सय्यद आणि आत्तार कुटुंबात वादावादी झाली. यावेळी सिराज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर ते बेशुद्ध पडल्याने तातडीने स्थानिक डॉक्टरांना बोलाविण्यात आले. त्यांनी शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. सिव्हिलमध्ये डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने सिराज यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार मृत सिराज यांचा भाऊ समीर बाबासाहेब आत्तार यांनी फिर्याद दाखल केली आहे.
चौकट
सिव्हिलमध्ये तणाव
मृत सिराज यांना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सिराज यांना मृत घोषित केल्यानंतर उपस्थितांनी दंगा सुरू केला. तणाव वाढतच चालला होता. याची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक सिव्हिलमध्ये दाखल झाले व त्यांनी जमावाला पांगवले. मात्र, तोवर रुग्णालयात तणावाचे वातावरण होते.