व्यापाऱ्यांकडून १ कोटीचा एलबीटी जमा

By Admin | Updated: March 31, 2015 00:27 IST2015-03-30T23:20:10+5:302015-03-31T00:27:46+5:30

महापालिकेला दिलासा : एकूण वसुली ६९ कोटींवर; मंगळवारी वसुलीची विशेष मोहीम

One crore LBT deposit from merchant | व्यापाऱ्यांकडून १ कोटीचा एलबीटी जमा

व्यापाऱ्यांकडून १ कोटीचा एलबीटी जमा

सांगली : महापालिका आणि एलबीटीविरोधी कृती समितीमधील संघर्ष संपल्यानंतर आज, सोमवारी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील जवळपास ७५ व्यापाऱ्यांनी सुमारे १ कोटी रुपयांचा एलबीटीचा भरणा आज महापालिकेत केला. ३0 मार्चअखेर महापालिकेची एकूण एलबीटीची वसुली ६९ कोटींच्या घरात गेली असून ३१ मार्चअखेर ७0 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. एलबीटी थकबाकीपोटी महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी छापासत्र सुरू केल्यानंतर गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. सांगलीत बेमुदत उपोषणही केले. त्यामुळे एलबीटीचा प्रश्न आणखी चिघळला. गेल्या दोन महिन्यांपासून व्यापारी आणि महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये वाक्युद्धही रंगले होते. खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा संघर्ष संपुष्टात आला. शनिवारी, २८ मार्च रोजी व्यापाऱ्यांनी उपोषण सोडले. थकबाकी आणि चालू मागणीपोटी भरावयाच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम ५ एप्रिलपर्यंत भरण्यात येईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे यांच्या नेतृत्वाखाली ७५ व्यापाऱ्यांनी महापालिका मुख्यालयात येऊन धनादेश जमा केले. व्यापाऱ्यांनी सायंकाळी महापालिकेत गर्दी केल्यानंतर जकात अधीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात बोलावण्यात आले. त्यांनी व्यापाऱ्यांकडून धनादेश जमा करून घेतले. विवरणपत्र अद्याप भरून दिले नसले तरी, येत्या काही दिवसात विवरणपत्रही जमा करण्यात येईल, असे व्यापारी प्रतिनिधींनी महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे धनादेश जमा करून घेण्यात आले. कुपवाड येथील एका व्यापाऱ्याने ५0 लाख रुपये एलबीटीपोटी आॅनलाईन जमा केले. महापालिकेत आलेल्या व्यापाऱ्यांनी सुमारे ५0 लाखांचे धनादेश जमा केले. त्यामुळे एकूण वसुलीत १ कोटी रुपयांची भर पडली. महापालिकेची एलबीटी वसुली आता ६९ कोटीच्या घरात गेली आहे. उद्या, ३१ मार्च रोजी चालू आर्थिक वर्षाचा शेवट होणार असल्याने या दिवशीही व्यापाऱ्यांचा असाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर चालू आर्थिक वर्षात ७0 कोटी रुपये जमा होतील. (प्रतिनिधी)



गुलाबपुष्प देऊन स्वागत
एलबीटी भरणा करण्यास आलेल्या व्यापाऱ्यांचे महापालिका अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर आयुक्तांशी झालेल्या चर्चेवेळी व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प दिले. एकमेकांनी सहकार्याची भावनाही यावेळी व्यक्त केली.

महापालिकेच्या एलबीटी थकबाकीचा डोंगर कायम आहे. चालू मागणीपोटी महापालिकेने अंदाजपत्रकात १४५ कोटी रुपये एलबीटी जमा होण्याचे गृहीत धरले होते. मागील वर्षाची थकबाकी जवळपास ६७ कोटींच्या घरात आहे. चालू आर्थिक वर्षात पुन्हा ७५ कोटींची थकबाकी राहणार आहे.
मागील ६७ कोटी आणि चालू थकबाकी ७५ कोटी गृहीत धरल्यास जवळपास १४२ कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी महापालिकेकडे केवळ चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. थकबाकीचे हे आकडे विवरणपत्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे विवरणपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.

Web Title: One crore LBT deposit from merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.