दीड लाखाचे दागिने लंपास

By Admin | Updated: October 16, 2014 00:07 IST2014-10-15T23:16:30+5:302014-10-16T00:07:43+5:30

सांगलीतील घटना : एसटी बस थेट पोलीस ठाण्यात

One and a half lakh jewelry jewelry | दीड लाखाचे दागिने लंपास

दीड लाखाचे दागिने लंपास

सांगली : येथील खणभागातील हेमा अमोल ननवरे या महिलेचे दीड लाखाचे दागिने चोरट्याने हातोहात लंपास केले. मुख्य बसस्थानकावर कागल-म्हसवड या एसटी बसमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. घटनेनंतर एसटी थेट शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेमा ननवरे यांचे नेवरी (ता. कडेगाव) हे माहेर आहे. आज (बुधवार) मतदान असल्याने त्या मतदान करण्यासाठी मंगळवारी दुपारी दोन मुलांना सोबत घेऊन नेवरीला जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी चार वाजता त्या कागल-म्हसवड बसमध्ये बसल्या. त्यावेळी एक महिला ‘अरे कुणाचे पाकीट मारले रे’, असे ओरडली. यामुळे बसमधील सर्व प्रवासी गोंधळून गेले. पळापळही झाली. त्यावेळी त्यांच्या पर्समधील एक पाकीट लंपास केले होते. या पाकिटामध्ये दीड लाखाचे दागिने होते. यामध्ये गंठण, चेन, अंगठी, वेडण, नेकलेस व नथ या दागिन्यांचा समावेश होता.
हेमा ननवरे यांच्या खांद्याला पर्स अडकविली होती. दागिने त्यांनी एका पाकिटात घालून हे पाकीट पर्समध्ये ठेवले होते. पाकीट मारले म्हणून जी महिला ओरडली, त्या महिलेनेच पर्सची चेन काढून दागिन्यांचे पाकीट चोरले असावे, असा संशय आहे. या घटनेनंतर ओरडणारी ही महिलाही गायब झाली होती.
नंतर बस थेट शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी काही प्रवाशांची झडतीही घेतली. रात्री उशिरा ननवरे यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)

बसस्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ
मुख्य बसस्थानकावर चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला. सातत्याने प्रवाशांना लुटले जात आहे. या ठिकाणी पोलीस चौकी आहे. मात्र तरीही पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. जयसिंगपूर, इचलकरंजी या भागातील चोरटे चोरी करुन जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: One and a half lakh jewelry jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.