चाेवीस तासाच्या उपचारासाठी दीड लाख उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST2021-08-21T04:31:53+5:302021-08-21T04:31:53+5:30
मिरज : मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी कारागृहात असलेला रुग्णालयचालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध २४ तासाच्या उपचारासाठी ...

चाेवीस तासाच्या उपचारासाठी दीड लाख उकळले
मिरज : मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी कारागृहात असलेला रुग्णालयचालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध २४ तासाच्या उपचारासाठी दीड लाख उकळल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी एका मृत रुग्णाचे नातेवाईक गुरुदेव महादेव कोरे (रा. कुंनूर, ता. मंगळवेढा, जि. साेलापूर) यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
कोविड साथीच्या काळात गुरुदेव कोरे यांचे वडील महादेव अमगोंडा कोरे यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराबाबत कोणतीही माहिती न देता रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. दाखल केल्यानंतर चोवीस तासात रुग्णाचा मृत्यू झाला. या २४ तासाचे रुग्णालयाचे बिल मात्र एक लाख चाळीस हजार रुपये भरून घेण्यात आले. उपचाराचे बिल मागितल्यानंतर ‘तुम्हाला बिल हवे की रुग्णावर उपचार’ असे सांगून वेळ मारून नेण्यात आली. बिल भरून घेतल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले व बिल भरल्याची पावतीही दिली नाही, असे गुरुदेव कोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची चाैकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी यापूर्वी डाॅ. जाधव बंधूंसह १३ जणांना अटक केली आहे.