सांगली : शहरातील विश्रामबाग येथील नागराज कॉलनी परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वायू दलातील निवृत्त अधिकाऱ्याची ४० हजारांची सोन्याची साखळी हिसडा मारून लांबविण्यात आली. याप्रकरणी बाळकृष्ण शंकर जाधव (वय ८१, रा. केतकी अपार्टमेंट, नागराज कॉलनी, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
वायू दलातून लेफ्टनंट म्हणून निवृत्त झालेले जाधव गुरुवार, दि. २६ रोजी सकाळी १० वाजता घराच्या गेटजवळ थांबले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेला एकजण त्यांच्याजवळ थांबला व त्याने दत्त मंंदिर कोठे आहे, अशी विचारणा करत त्यांना बोलण्यात गुंतवले व अचानक त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसडा मारून पोबारा केला. अचानक घडलेल्या प्रकाराने त्यांनी आरडाओरडा केला; पण तोवर संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर जाधव यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली. भरदिवसा वृध्दाची सोनसाखळी लंपास करण्यात आल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. पोलिसांनी तीन साक्षीदार तपासत परिसरातील सीसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्राथमिक तपास सुरू केला आहे.