'शिराळ्यात जुने राजकारण नव्या वळणावर
By Admin | Updated: December 28, 2015 00:29 IST2015-12-27T23:57:41+5:302015-12-28T00:29:21+5:30
शिवाजीरावांचे ‘एकला चलो रे’ : विधानसभेपासून दुरावलेल्या दोघा ‘भाऊं’चे ऐक्य

'शिराळ्यात जुने राजकारण नव्या वळणावर
येळापूर : दुष्काळ व पाण्याच्या विषयावरून शिराळा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, विधानसभेला वेगळी झालेली दोन भाऊंची युती पुन्हा जुळली असून, यापुढील सर्व निवडणुका एकत्र लढवू, असा संदेश देत मोर्चा काढला, तर आमदार शिवाजीराव नाईक यांनी ‘एकला चलोरे’च्या घोषणेसह कामाला सुरुवात केली आहे.
दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. शिवाजीराव नाईक-भाजप, माजी आमदार मानसिंगराव नाईक- राष्ट्रवादी, तर सत्यजित देशमुख यांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यामध्ये शिवाजीराव नाईक यांनी बाजी मारली. त्यानंतर दुरावलेले दोन भाऊ एकत्र येतील की नाही, असे वाटत असतानाच शिराळा बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत या दोघांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
त्यातच वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाईत सोडण्यात यावे, गिरजवडे मध्यम प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, वाकुर्डे योजनेचे वीज बिल, डाव्या कालव्याची कामे आणि तालुका दुष्काळी करावा आदी विषयांवर सर्व नेत्यांत आरोप-प्रत्यारोपाने संपूर्ण शिराळा मतदारसंघात वातावरण तापले. त्यातच कॉँगे्रस-राष्ट्रवादीने एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दुष्काळाच्या मुख्य प्रश्नाला हात घातला आणि युती सरकारचे वाभाडे काढले. तालुका दुष्काळी जाहीर व्हायला अजून अवधी लागण्याची शक्यता आहे.
विधानसभेला विभागलेल्या दोन भाऊंनी एकत्र येत आमदार नाईक यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर आ. शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या माध्यमातून ‘एकला चलो रे’वर भर देत वाटचाल सुरू केली आहे. (वार्ताहर)
विविधप्रकारे व्यथा
तालुक्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झालेला आहे आणि खरीप हंगामातील पीक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र मोर्चे काढून निवेदने दिली, तर आ. नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. चुकीचा पंचनामा केल्याच्या मुद्यावर जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी पदयात्रा काढून दुष्काळाच्या व्यथा मांडल्या.