वृद्धेचा होरपळून मृत्यू
By Admin | Updated: November 12, 2014 23:29 IST2014-11-12T23:12:45+5:302014-11-12T23:29:30+5:30
कासेगावातील घटना : शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

वृद्धेचा होरपळून मृत्यू
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे शॉर्टसर्किट होऊन घराला लागलेल्या भीषण आगीत श्रीमती पुष्पा अशोक कुलकर्णी (वय ७०) ही वृद्धा होरपळून जागेवरच मृत झाली. आज, बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
येथील ग्रामपंचायतीजवळ कुलकर्णी कुटुंबियांचे जुने घर असून, ते ‘बामणाचा वाडा’ म्हणून प्रचलित आहे. वाड्यातील वरील बाजूच्या एका खोलीमध्ये पुष्पा कुलकर्णी राहात होत्या. त्यांच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले असून, त्यांना अपत्य नाही. वाड्यातील दुसऱ्या भागात पुष्पा यांचे दीर, जाऊ, पुतणे स्वतंत्र राहतात. आज सकाळी पुष्पा एकट्याच घरामध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या खोलीला आतून कुलूप होते.
सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. संपूर्ण घराचे बांधकाम लाकडी असल्याने क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु
आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर कृष्णा कारखाना आणि इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. वाडा जळत असताना पुष्पा यांचा ‘वाचवा, वाचवा’ असा आक्रोश येत होता, परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने कोणालाही पुढे जाता येत नव्हते. त्यातच पुष्पा यांच्या खोलीला
आतून कुलूप असल्याने कोणालाही आत जाता आले नाही. त्यांचा
भाजून जागीच मृत्यू झाला.
(प्रतिनिधी)
नेमके कारण काय?
कुलकर्णी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, त्यांची मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आहे. पुष्पा यांच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाल्याने व त्यांच्यामागे अपत्य नसल्याने या घटनेमागे नेमके काय, याबाबत चर्चा सुरू आहे. ही घटना शॉर्टसर्किट आहे की, आत्महत्या की, घातपात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.