इस्लामपुरात फटाक्यांच्या आतषबाजीत झळकले तैलचित्र आणि फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:27 IST2021-03-16T04:27:38+5:302021-03-16T04:27:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेच्या सभागृहात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे तैलचित्र लावावे आणि काळा ...

इस्लामपुरात फटाक्यांच्या आतषबाजीत झळकले तैलचित्र आणि फलक
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेच्या सभागृहात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे तैलचित्र लावावे आणि काळा मारुती मंदिराजवळील व्यापारी संकुलास वनश्री नानासाहेब महाडिक यांचे नाव द्यावे, यासाठी आंदोलन करणाऱ्या चंद्रशेखर तांदळे यांनी सोमवारी फटाक्यांची आतषबाजी करत सभागृहात डांगे यांचे तैलचित्र, तर व्यापारी संकुलात नानासाहेब महाडिक यांच्या नावाचा फलक लावून खळबळ उडवून दिली.
सकाळी प्रशासनाला काही कळण्यापूूर्वीच तांदळे यांनी थेट सभागृहात धडक मारत डांगे यांचे तैलचित्र झळकावले, तर व्यापारी संकुलावर वनश्री नानासाहेब महाडिक व्यापारी संकुल असा नामफलकदेखील फडकावला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने पोलिसांना पाचारण करत दुपारी सभागृहात लावलेले अण्णासाहेब डांगे यांचे तैलचित्र काढून घेतले, तर सायंकाळच्या वेळी व्यापारी संकुलावर लावलेला नानासाहेब महाडिक यांच्या नावाचा फलकही बाजूला केला.
दरम्यान, नगरपालिका प्रशासनाच्या या दडपशाहीचा निषेध करत चंद्रशेखर तांदळे यांनी शनिवारी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही विषय सभेच्या पटलावर घ्यावेत, या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. सभेमध्ये या मागण्यांचा विचार न केल्यास सभा सुरू असताना सभागृहाला टाळे ठोकण्याचा इशारा तांदळे यांनी दिला आहे.