पदाधिकाऱ्यांची गावे आरोग्य सेवेपासून वंचित
By Admin | Updated: March 11, 2015 00:11 IST2015-03-10T23:37:32+5:302015-03-11T00:11:11+5:30
तपासणीत स्पष्ट : सागाव, येलूर, दिघंचीचा कारभार चांगला

पदाधिकाऱ्यांची गावे आरोग्य सेवेपासून वंचित
सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तीन सभापतींच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार ढिसाळ असल्याचे तेथील कामगिरी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सागाव, येलूर आणि दिघंची केंद्रांची कामगिरी उत्तम असून त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘टॉप टेन’च्या यादीत एकाही पदाधिकाऱ्याचे आरोग्य केंद्र नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण जनतेला मूलभूत सुविधा दिल्या जातात का, प्रसुती किती झाल्या आदींचा विचार करून जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ‘टॉप टेन’ आरोग्य केंद्रांची निवड केली जाते. फेब्रुवारी महिन्याच्या पाहणीमध्ये शिराळा तालुक्यातील सागाव आरोग्य केंद्रास शंभर पैकी ९८ गुण मिळाल्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. येलूर (ता. वाळवा) केंद्राने ८५ गुण मिळवून द्वितीय, तर दिघंची (ता. आटपाडी) केंद्राने ८० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मिरज तालुक्यातील खंडेराजुरी (गुण ७९), नांद्रे (७७), देशिंग (७४), एरंडोली (६३), तासगाव तालुक्यातील हातनूर (७०), मणेराजुरी (६२) शिराळा तालुक्यातील शिरसी (६२) या केंद्रांचा ‘टॉप टेन’मध्ये समावेश आहे.
मात्र पदाधिकाऱ्यांच्या गावातील आरोग्य केंद्रांचा कारभार ढिसाळ असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. उमदी हे जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांचे गाव आहे, परंतु येथील आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे दिसत आहे. या आरोग्य केंद्राला शंभरपैकी केवळ १४ गुण मिळाले आहेत. यामुळे त्यांचा गुणानुक्रम हा ५० पर्यंत खाली गेला आहे. आटपाडी हे तर सभापती उज्वला लांडगे आणि सभापती मनीषा पाटील या दोन्ही सभापतींचे गाव. येथील आरोग्य केंद्रास केवळ १० गुण मिळाले आहेत. त्यांचा गुणानुक्रम ५३ आहे.
याशिवाय, दहा आरोग्य केंद्रांच्या यादीत उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती पपाली कचरे, गजानन कोठावळे यांच्या आरोग्य केंद्रांचा समावेश नाही. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील टॉप टेन केंद्रे
प्रा.आ.केंद्रगुणगुणानुक्रम
सागाव९८१
येलूर८५२
दिघंची८०३
खंडेराजुरी७९४
नांद्रे७७५
देशिंग७४६
हातनूर७०७
एरंडोली६३८
शिरशी६२९-१०
मणेराजुरी६२९-१०