अधिकारी देता का अधिकारी..?
By Admin | Updated: June 2, 2015 00:34 IST2015-06-02T00:34:02+5:302015-06-02T00:34:02+5:30
आयुक्तांचे साकडे : महापालिकेतील रिक्त पदांबाबत प्रधान सचिवांना निवेदन

अधिकारी देता का अधिकारी..?
सांगली : रिक्त पदांमुळे विस्कळीत झालेल्या कारभाराबाबत महापालिकेच्या प्रत्येक विभागातून चिंता व्यक्त होत आहे. महत्त्वाच्या पदांबरोबरच महापालिकेतील रिक्त पदांची संख्या ६०० च्या घरात गेली आहे. त्यामुळे आयुक्त अजिज कारचे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत साकडे घातले आहे. महापालिकेतील रिक्त असलेली मुख्य चार विभागप्रमुखांची पदे तरी प्राधान्याने भरावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आयुक्त कारचे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेत सध्या आरोग्य अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, मुख्य लेखापरीक्षक अशी चार महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या महत्त्वाच्या पदांवर सक्षम अधिकारी नसल्याने दैनंदिन कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे कामाचा खोळंबा होऊ नये ,यासाठी तातडीने या पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. या पत्राची दखल आता शासन कितपत घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या कारभारात सध्या रिक्त पदांचा परिणाम दिसत आहे. ३० मे रोजी एका दिवसात १२ कर्मचारी निवृत्त झाले. दरमहा सध्या ५ ते ६ कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल करीत आहेत. सध्या रिक्त पदांची संख्या ५७८ इतकी असून, पुढीलवर्षी ती सातशेच्या घरात जाणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेला या रिक्त पदांचा फटका बसत आहे. शहरातील नागरी सुविधांची कामे सुरळीत होत नाहीत. प्रशासकीय कामांमध्येही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा परिणाम जाणवत आहे. प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच प्रकारची पदे रिक्त आहेत.
महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दोन महिने पगार विलंबाने होत आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमधील उत्साह कमी होत आहे. यातूनच मग निवृत्ती जवळ आलेल्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृती घेणे पसंत केले आहे. दरमहा आता असे ५ ते ६ अर्ज महापालिकेकडे दाखल होत आहेत. स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त पदांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुढीलवर्षी जवळपास १०० कर्मचारी निवृत्त होणार आहेत. म्हणजे पुढीलवर्षी जवळपास पावणेसातशे पदे रिक्त होतील. (प्रतिनिधी)