निधीवाटपावरून जिल्हा परिषदेत पदाधिकारी-सदस्य आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:56+5:302021-09-15T04:31:56+5:30
सांगली : जिल्हा परिषदेतील आठ कोटींच्या निधी वाटपावरून पदाधिकारी आणि सदस्य आमने-सामने आले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींनी विश्वासात ...

निधीवाटपावरून जिल्हा परिषदेत पदाधिकारी-सदस्य आमने-सामने
सांगली : जिल्हा परिषदेतील आठ कोटींच्या निधी वाटपावरून पदाधिकारी आणि सदस्य आमने-सामने आले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींनी विश्वासात न घेता निधीचे असमान वाटप केल्याचा आरोप सदस्यांनी मंगळवारी केला.
सदस्य शरद लाड यांच्यासह नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, संजय पाटील, अर्जुन पाटील, सागर पाटील, विशाल चौगुले या सर्वपक्षीय सदस्यांनी पत्रकार बैठकीत आंदोलनाचा इशारा दिला. जिल्हा परिषदेला स्वीय निधीचे आठ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याच्या समानवाटपाची मागणी सदस्यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ६५ लाखांचा निधी घेतला आहे. उपाध्यक्षांनी ५० लाख, तर चार सभापतींनी प्रत्येकी ४५ लाख घेतले आहेत. या प्रक्रियेत अधिकारी दबावाखाली आहेत.
पदाधिकाऱ्यांनी विश्वासात न घेता निधीची खिरापत वाटून घेतल्याचा आरोप सदस्यांनी केला. भाजपसह सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी याविरोधात दंड थोपटल्याचे लाड म्हणाले. सदस्यांनी सांगितले की, निधीवाटपाचे कारस्थान हाणून पाडू. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना भाजप सदस्यांसोबत भेटलो आहोत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही भेटणार आहोत. प्रसंगी उपोषणाला बसू, न्यायालयातही जाऊ. जिल्हा परिषदेचे कोणतेही कामकाज होऊ देणार नाही.
ते म्हणाले की, घरकुल वाटपातही पदाधिकाऱ्यांनी मनमानी केली आहे. स्वत: प्रत्येकी पाच घरकुले घेऊन सदस्यांची फक्त दोन घरकुलांवर बोळवण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्वीय निधीची तयारी आम्ही दर्शविली होती, पण थोडेही काम झाले नाही. कोणत्याही मंजुऱ्या घेतल्या नाहीत. ‘पुतळ्याच्या सर्व परवानग्या मी स्वत: महिन्याभरात आणतो’, असे उपाध्यक्षांनी सांगितले होते, पण काहीही काम झाले नाही.
संजय पाटील यांनी इशारा दिला की, निधीवाटपात न्याय मिळाला नाही तर अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनांना कुलपे लावू.
चौकट
सर्वांना न्याय मिळेल
याबाबत अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, निधीवाटपात एकाही सदस्यावर अन्याय होणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन वाटप करू. त्यांचे आरोप चुकीचे आणि गैरसमजातून आहेत.