थकबाकी वसुलीसाठी पदाधिकारी रस्त्यावर

By Admin | Updated: March 12, 2015 00:07 IST2015-03-11T23:39:44+5:302015-03-12T00:07:23+5:30

महापालिकेची तयारी : २३ ते २५ दरम्यान मोहीम

Offensive recovery officer on the road | थकबाकी वसुलीसाठी पदाधिकारी रस्त्यावर

थकबाकी वसुलीसाठी पदाधिकारी रस्त्यावर

सांगली : महापालिकेच्या एलबीटी, घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करांसह विविध कराच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी आता महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहेत. तसा प्रस्ताव महापौर विवेक कांबळे यांनी आयुक्तांना दिला आहे. २३ ते २५ मार्चदरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरात प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. एकाचवेळी विविध कर विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन थकबाकीदारांच्या दारात जाण्याचा उपक्रम हाती घेतला आहेत. महापालिकेच्या कर विभागाकडील थकबाकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात आहे. एकट्या एलबीटीची थकबाकी २२५ कोटींच्या घरात आहे. त्यात दंड व व्याजाचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षापासून घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कराची थकबाकीही अधिक आहे. घरपट्टी विभागाकडे २० कोटी, तर पाणीपट्टीची १० कोटींपेक्षा अधिक थकित आहे. मालमत्ता कराबाबत प्रशासनच उदासीन आहे. या विभागाकडे कर्मचारीच नसल्याने दरवर्षी गाळ्यांची भाडेपट्टीसह विविध कर वसुली असमाधानकारक होत आहे. पालिकेची तिजोरी गेल्या वर्षभरात बऱ्याच प्रमाणात रिकामी झाली आहे. एलबीटीसह उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीचे उत्पन्न घटल्याने आर्थिक स्थिती ‘हॅण्ड टू माऊथ’ झाली आहे. या थकित कराच्या वसुलीसाठी महापौर कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या २३ ते २५ मार्च या तीन दिवसांत सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात प्रायोगिक तत्त्वावर वसुली मोहीम हाती घेतली जाणार आहे. सांगलीत महापालिका मुख्यालय ते गणपती मंदिर, मिरजेत पालिका कार्यालय ते बसस्थानक, तर कुपवाडला विभागीय कार्यालय ते मुख्य रस्ता या परिसरात सर्व कर विभागाचे प्रमुख अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वसुली मोहीम राबविली जाणार आहे. त्यात पदाधिकारी, नगरसेवक सहभागी असतील.
त्याचा प्रस्ताव महापौरांनी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे दिला आहे. मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी २० मार्च रोजी बैठकही घेतली जाणार आहे. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. (प्रतिनिधी)


थकबाकीदारांच्या दारात जाणार
महापालिकेच्या कर विभागाकडील थकबाकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात आहे. या थकित कराच्या वसुलीसाठी महापौर कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. २३ ते २५ मार्च या तीन दिवसांत सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात प्रायोगिक तत्त्वावर वसुली मोहीम हाती घेतली जाणार आहे. एकाचवेळी कर विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन थकबाकीदारांच्या दारात जाण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

Web Title: Offensive recovery officer on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.