कोरोनाला रोखण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:05+5:302021-03-24T04:24:05+5:30
जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. सुमनताई पाटील, ...

कोरोनाला रोखण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय
जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. शहरी व ग्रामीण आठवडी बाजारांवर निर्बंधाचे संकेत दिले. जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेत ते बोलत होते.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी उपस्थित होते. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरपंचांची ऑनलाइन कार्यशाळा झाली. त्यामध्ये १७२ सरपंच सहभागी झाले. चौदा प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सुविधांच्या रुग्णवाहिका जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. ते म्हणाले, कोरोना वाढत असल्याने पुन्हा उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आठवडा बाजारांसह गर्दीची ठिकाणे बंद करावी लागतील. दररोज २०० हून अधिक रुग्ण सापडत असल्याने गाफील राहून चालणार नाही. कोरोना काळात आरोग्याचे महत्त्व लक्षात आले. महाराष्ट्रातील तिसरी कोरोना चाचणी प्रयोगशाळा मिरजेत सुरू झाली. अंदाजपत्रकात सांगलीसाठी आणखी एक रुग्णालय मंजूर झाले. आता प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणार आहोत. आणखी १६ रुग्णवाहिका देऊ, त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देऊ.
डॉ. कदम म्हणाले, कोरोनाची दुसऱ्या लाटेसारखी स्थिती आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायला हवे. स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यायला हवा. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळावी लागेल. गावोगावी सरपंचांनी यासाठी पुढाकार घ्यावा. प्रसंगी वाकडेपणाही घ्यावा. काशिलिंगवाडी (ता. जत) येथे लग्नसोहळ्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला, असे प्रसंग टाळण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी डुडी यांनी कोरोना उपायांचा आढावा घेतला. कार्यक्रमाला आ. सुमनताई पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, माजी अध्यक्षा मालन मोहिते, सदस्य सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, संजय पाटील, सरिता कोरबू, जयश्री पाटील, संपतराव देशमुख, मनोज मुंडगनूर, अरुण बालटे, जितेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, आरोग्याधिकारी मिलिंद पोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, राहुल गावडे आदी उपस्थित होते.
चौकट
या गावांना मिळाल्या रुग्णवाहिका
मांगले, रांजणी, भिलवडी, देशिंग, कामेरी, खंडेराजुरी, शिरशी, येडेमच्छिंद्र, आटपाडी, कोंतेवबोबलाद, वळसंग, आगळगाव, बिळूर आणि येळवी या गावांना जयंत पाटील व डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या.