विवाहाच्या निमित्ताने कट्टर विरोधक आले एकत्र

By Admin | Updated: February 12, 2015 00:29 IST2015-02-11T23:37:59+5:302015-02-12T00:29:54+5:30

शिराळ्यात चर्चा : जयंतराव, पतंगराव, शिवाजीराव नाईक यांच्यात रंगली गप्पांची मैफल

On the occasion of the wedding, the hardcore opponents came together | विवाहाच्या निमित्ताने कट्टर विरोधक आले एकत्र

विवाहाच्या निमित्ताने कट्टर विरोधक आले एकत्र

संजय घोडे-पाटील - कोकरूड -राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र असत नाही. राजकारणाचे संदर्भ दिवसागणिक बदलत असतात... सामान्य माणसाला किमान पहायला तरी हे चित्र दुर्लभच, पण सोमवार, दि. ९ रोजी चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची कन्या मोनालिसा व दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचे सुपुत्र मानसिंग यांच्या विवाह सोहळ््यात याची झलक पहावयास मिळाली. आनंद व दु:खाच्या क्षणी आम्ही राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊ शकतो, हे जिल्ह्यातील नेतेमंडळींनी दाखवून दिले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक व आमदार सुरेश खाडे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक या विवाह सोहळ््यानिमित्त योगायोगाने एकत्र आले. एरव्ही एकमेकांचे तोंडही न पाहणारी ही नेतेमंडळी एकमेकांची अगत्याने चौकशी करीत होती! अक्षता आटोपल्यानंतर नातेवाईक व निमंत्रितांकरिता भोजन, अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आमदार नाईक नवदाम्पत्यास शुभेच्छा देऊन बाहेर पडण्याच्या तयारीत असताना जयंत पाटील यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करीत ‘साहेब, गडबड कशाला करताय, जेवण करूया’, असा आग्रह केला. त्यावेळी आमदार नाईक त्यांना म्हणाले, ‘आमच्या कारखान्यावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे येणार आहेत आणि पुत्र रणधीरदेखील बाहेरगावी असल्यामुळे मला गेले पाहिजे.’ मात्र जयंत पाटील यांच्या आग्रहास्तव या सर्व नेतेमंडळींनी जेवणाऐवजी एकाच टेबलवर अल्पोपहार घेतला. एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी या प्रसंगात ही नेतेमंडळी मान, अपमान व राग विसरून एकत्र आली होती. सर्वांनीच पतंगराव कदम यांच्या शाब्दिक कोट्यांवर हसत अल्पोपाहार घेतला.


दुर्मीळ क्षण टिपण्यासाठी कॅमेरे सरसावले
अनेकांनी मोबाईलमध्ये हा दुर्मीळ क्षण टिपला. क्षणार्धात ही छायाचित्रे व्हॉटस्-अ‍ॅप व फेसबुकवर टाकण्यात आली. याची शिराळा-वाळवा तालुक्यांत जोरदार चर्चा आहे. राजकारणात कितीही वैमनस्य असले, मनात कटुता असली तरी, राजकारणी मंडळी आनंद वा दु:खाच्या प्रसंगी एकत्र येतात, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.

Web Title: On the occasion of the wedding, the hardcore opponents came together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.