शिराळा : नाटोली (ता. शिराळा) येथे तहसीलदारांच्या आदेशानुसार रस्त्यावरील अडथळा काढण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रूपेश दिलीप पाटील, प्रवीण दिलीप पाटील, विलास रंगराव पाटील, आनंदा रंगराव पाटील, दत्तात्रय आनंदा पाटील या पाच जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना गुरुवार दुपारी १.३० च्या दरम्यान घडली होती.
येथील सर्व्हे नंबर १११ मधील अतिक्रमणाबाबत तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी टी. एस. खैरे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यानुसार खैरे हा रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये गेले हाेते. यावेळी पाच जणांनी मंडल अधिकारी खैरे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत मंडल अधिकारी खैरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अधिक तपास हवालदार बी. एस. झाजरे करीत आहेत.