सांगली : कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योगांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी काही बँकांकडून सुरळीतपणे होत असताना काही बँकांनी अडवणुकीचे प्रकार सुरू केले आहेत. याबाबत बुधवारी सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बँकांना याबाबत सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट केले. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना आर्थिक फटका बसला आहे. त्यावर केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपत्कालिन पतहमी योजना (ईसीएलजीएस) व अनुदानीत व्याज मुदत कर्ज (एफआयटीएल)च्या माध्यमातून उद्योगांना सरकारी व खासगी बँकांद्वारे आर्थिक मदत जाहीर केली आहे. बऱ्याच बँकांनी या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत; परंतु काही बँका या योजनांचा उद्योजकांना लाभ देणेसाठी टाळाटाळ करत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांची या योजनेअंतर्गत असलेली प्रकरणे निकालात काढण्यात येतील, असे आश्वासन दिले. योजनांचा लाभ देण्यासाठी बँका टाळाटाळ करत असल्यास अशा उद्योजकांनी त्वरित असोसिएशनच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संजय आराणके यांनी केले आहे.