सांगलीत सोशल मीडियावरून उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह मजकूर
By Admin | Updated: October 14, 2014 23:19 IST2014-10-14T22:41:16+5:302014-10-14T23:19:02+5:30
पोलिसांची कारवाई : पोलीसपुत्रास अटक

सांगलीत सोशल मीडियावरून उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह मजकूर
सांगली : विधानसभा निवडणुकीत सांगलीतील एका उमेदवाराची बदनामी करणारा आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावरुन (व्हॉटस्अप) प्रसारित केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी कृष्णराज शंकर कदम (वय २५, रा. वारणाली, गल्ली क्रमांक एक, विश्रामबाग) यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. तो एका पोलिसाचा मुलगा आहे.
कृष्णराज कदम याने सोमवारी रात्री पावणेबारा वाजता एका उमेदवाराबद्दल बदनामीकारक आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला होता. उमेदवाराचे नाव घालून हा संदेश प्रसिद्ध केल्याने तणाव निर्माण झाला होता. या उमेदवाराचे समर्थक आक्रमक बनले होते.
या समर्थकांनी पोलिसांशी संपर्क साधला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी हा संदेश पाठविणाऱ्याचा शोध घेतला. त्यावेळी कृष्णराज कदमचे नाव निष्पन्न झाले. त्याला तातडीने अटक केली. त्याच्याविरुद्ध खोटा संदेश पाठवून मतदान प्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न व उमेदवाराचा पराभव व्हावा, या हेतूने हे कृत्य केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. दुपारी त्याला न्यायालयात उभे केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली आहे. संशयित कदम याच्यावर कारवाई करण्यासाठी ठाण्यासमोर जमाव जमविल्याप्रकरणी दहा समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)