सांगलीत गुरुवारी होणारा ओबीसी महामेळावा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:39+5:302021-02-23T04:41:39+5:30
सांगली : ओबीसी आरक्षणासाठी सांगलीत गुरुवारी (दि. २५) आयोजित केलेला महामेळावा स्थगित करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत ...

सांगलीत गुरुवारी होणारा ओबीसी महामेळावा रद्द
सांगली : ओबीसी आरक्षणासाठी सांगलीत गुरुवारी (दि. २५) आयोजित केलेला महामेळावा स्थगित करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती सकल ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी सकल ओबीसी संघटनेतर्फे गुरुवारी महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रकाश शेंडगे यांच्या उपस्थितीतही पुढील पंधरवड्यात दुसरा मेळावा होणार होता. यातील गुरुवारचा मेळावा रद्द करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. संयोजक बाळासाहेब गुरव, अरुण खरमाटे, सुनील गुरव, शशिकांत गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात कोरोनाबाधित वाढू लागल्याने मेळावा रद्द केला. तशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही केली होती. जिल्हा प्रशासनानेही गर्दी टाळण्यासाठी मेळावा रद्द करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाचा फैलाव ओसरताच नवा दिवस निश्चित केला जाईल.
यावेळी दीपक सुतार, कैलास स्वामी, चंद्रकांत मालगावकर, अशोक ओंबासे, एकनाथ सूर्यवंशी, अर्चना सुतार, रूपाली परीट, रंजना माळी आदी उपस्थित होते.
चौकट
नेत्यांची बदनामी नको
परीट समाजाचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंत्री वडेट्टीवार मोठे प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्याविषयी गैरसमज पसरवून बदनामीचा प्रयत्न काहीजण करत आहेत, ते खपवून घेतले जाणार नाही. आपसातील मतभेदांपोटी वडेट्टीवार यांच्यावर आरोप करू नयेत.