नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर जुनीच आव्हाने!

By Admin | Updated: May 22, 2015 00:11 IST2015-05-21T23:23:17+5:302015-05-22T00:11:24+5:30

काळ कसोटीचा : जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना, अवैध धंद्यांना चाप बसणार?

Nutan District Police Chief faces new challenges! | नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर जुनीच आव्हाने!

नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर जुनीच आव्हाने!

सचिन लाड - सांगली -सुनील फुलारी नावाचं आणखी एक कडक शिस्तबद्धतेचं वादळ सांगली पोलीस दलात दाखल झालंय. त्यांच्यासमोर काम करण्यासाठी जुनीच आव्हाने आहेत. सामान्य माणूस सुरक्षित राहावा, त्यांना गुन्हेगारांचा त्रास होऊ नये, रस्त्यावरुन जाताना प्रत्येकाला सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी फुलारी यांना गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी हातात दंडुका घेऊनच रस्त्यावर उतरावे लागणार आहे.
अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी ते काय करतात, त्यांना ते चाप लावणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. गेल्या आठ वर्षांपासून अवैध धंदे बंद आहेत. चोरून सुरू असलेले अवैध धंदे लोकसहभागातून उद्ध्वस्त केले जात आहेत. ‘वरकमाई’ बंद झाल्याने पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या प्रकरणात खाबूगिरीचे प्रमाण वाढले. यातून अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आणि अडकत आहेत.
ही खाबूगिरी रोखण्याची गरज आहे. तत्कालीन पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडले. त्यांच्या कारवाईचा धसका घेऊन बहुतांश गुन्हेगारांनी कारागृहात राहणेच पसंत केले, तर अनेक गुन्हेगार घरातून बाहेर पडलेच नाहीत. पण हेच गुन्हेगार सावंत यांच्या बदलीची वाट पाहत होते. त्यांची आता बदली झाल्याने गुन्हेगारांच्या कारवाया पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच त्यांचा बंदोबस्त करावा लागेल.
पोलिसांच्या बदल्यांचे ‘गॅझेट’ फोडताना अनेक कर्मचाऱ्यांचे रुसवे-फुगवे चेहरे पाहावे लागणार आहेत. प्रत्येकाला मोक्याचे ठाणे हवे असल्याने, त्यांची बदली करताना फुलारी यांना तारेवरची कसरत करावी लागेल. ‘ड्रंक अँण्ड ड्राईव्ह’ ही मोहीम राबवून त्यामध्ये ते सातत्य ठेवणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी नियोजन करावे लागेल. शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.
सात महिन्यापूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचा छडा लागलेला नाही. अशा थंडावलेल्या तपासांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. घरफोडी, चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग हे गुन्हे सातत्याने घडत आहेत. अपवाद वगळता अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयश आले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस नियोजन करावे लागेल. १७ पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीची मागणी केली आहे. या सर्वांची बदली झाल्यास येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांच्या जोरावर त्यांना काम करावे लागणार आहे.

‘गॅझेट’ फुटणार... खांदेपालट होणार?
जिल्ह्यात २५ पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण व सांगली मिरजेतील वाहतूक नियंत्रण शाखा, अशी मोक्याची ठिकाणे आहेत. मोक्याचे ठिकाण मिळावे, अशी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची इच्छा असते. येत्या चार-आठ दिवसात फुलारी यांना कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे ‘गॅझेट’ फोडावे लागणार आहे. यासाठी ते कोणती रणनीती वापरतात, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर २५ पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांचे काय? अनेक अधिकाऱ्यांना ठाण्यातील दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. १७ अधिकाऱ्यांनी बदलीची मागणी केली आहे. या बदल्यात नव्याने किती अधिकारी मिळणार आहेत, ही सर्व बेरीज-वजाबाकी करुन अधिकाऱ्यांचेही खांदेपालट करावे लागणार आहे.

Web Title: Nutan District Police Chief faces new challenges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.