सागावात स्तब्धता; शिवारात पेरणीची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:37+5:302021-06-01T04:19:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : कोरोनामुळे सागाव (ता. शिराळा) येथील वातावरण गेल्या काही दिवसांपासून सुनसान आहे. बंद असलेले व्यवहार, ...

सागावात स्तब्धता; शिवारात पेरणीची धांदल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : कोरोनामुळे सागाव (ता. शिराळा) येथील वातावरण गेल्या काही दिवसांपासून सुनसान आहे. बंद असलेले व्यवहार, ओस पडलेले रस्ते व चोख बंदोबस्त यामुळे गावात कमालीची स्तब्धता आहे. परंतु, वर्षाकाठीची धान्याची तजवीज करण्यासाठी ग्रामस्थ शिवारात पेरणीत व्यस्त आहेत.
शिराळा तालुक्यातील सागावमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची संख्या दोनशेवर गेल्याने गावात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन सर्व उपाय करत आहे. पंधरा दिवसांपासून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. नवीन रुग्णांना शाळांमध्ये विलग केले आहे. परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. ग्रामस्थही प्रशासनाला सहकार्य करत आहेत.
दरम्यान, गाव बंद काळातच पेरणीचा हंगाम आला आहे. कोरोनामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे गावात स्तब्धता आहे. मात्र, असे असले तरी पेरणी ही करावीच लागणार, हे लक्षात घेऊन शेतकरी कोरोनाचे नियम पाळत पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्य गृह अलगीकरणात आहेत. अशा अवस्थेत त्यांच्यापुढे पेरणीची समस्या निर्माण झाली आहे. गाव सुनसान तर शिवारात पेरणीची धांदल, असे चित्र आहे.