आता आला नवरात्रोत्सव, धास्तावले सारे इच्छुक!
By Admin | Updated: September 18, 2014 23:25 IST2014-09-18T23:07:46+5:302014-09-18T23:25:57+5:30
मंडळांना पर्वणी : मंडळे तीच, अध्यक्ष मात्र बदलले

आता आला नवरात्रोत्सव, धास्तावले सारे इच्छुक!
दिलीप मोहिते -- विटा -खानापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा फिव्हर वाढला असून, इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे; मात्र गावोगावचे सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे आता इच्छुकांची डोकेदुखी ठरत आहेत. गणेशोत्सव काळात मंडळांनी भावी इच्छुकांकडून हात धुऊन घेतला. अनेक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी, बेन्जो, शेडसाठी पत्रे, यासह बरेच साहित्य पदरात पाडून घेतले. आता नवरात्रोत्सव सुरू होत असून, त्याच गणेश मंडळांचे रूपांतर नवरात्रोत्सव मंडळात झाल्याने इच्छुक चांगलेच धास्तावले आहेत.
येथे इच्छुकांनी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी केली आहे. गणेशोत्सवात युवकांनी गल्ली-बोळात स्थापना मंडळांची करून इच्छुकांना गणेशाच्या आरतीसाठी निमंत्रित केले. त्यापूर्वी या मंडळांनी इच्छुकांना गाठून मंडळासाठी डॉल्बी, बॅन्जो, शेडसाठी पत्रे, विद्युत रोषणाई, महाप्रसाद यासह अन्य खर्च इच्छुकांच्या माथी मारला. आता २५ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे आचारसंहिता असली, तरी नवरात्रोत्सवही धडाक्यात साजरा करण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे. परिणामी, गेल्या महिन्यातील गणेशोत्सव मंडळांचेच रूपांतर आता नवरात्रोत्सव मंडळांत झाले आहे. युवक तेच असून, केवळ मंडळांचे अध्यक्ष बदलले आहेत. त्यामुळे नवे अध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते इच्छुकांच्या मागे लागले आहेत.
गणेशोत्सव मंडळांना भरीव ओवाळणी दिल्यानंतर आता इच्छुकांसमोर नवरात्रोत्सव उभा ठाकला आहे. या उत्सवात युवकांना खूश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा खिसा रिकामा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील इच्छुक धास्तावले आहेत. यंदा मंडळांसाठी विधानसभा निवडणूक पर्वणी ठरणार आहे.
खानापूर मतदारसंघातील खानापूर व आटपाडी या दोन तालुक्यांसह तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलच्या २१ गावांतही आता नवरात्रोत्सव मंडळे मूळ धरू लागली आहेत. मंडळातील युवकांचे शक्तिप्रदर्शन करून मंडळांसाठी साहित्य पदरात पाडून घेण्याचा प्रकार आता सुरू झाला आहे. या तरुण मंडळांची नाराजी परवडणार नसल्याने बहुसंख्य इच्छुक खिशात हात घालू लागले आहेत.