पशुधन अधिकाऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: August 13, 2014 23:35 IST2014-08-13T22:55:07+5:302014-08-13T23:35:23+5:30
पन्नास जणांचा समावेश : दीड महिना लसीकरण थांबविल्याप्रकरणी कारवाई

पशुधन अधिकाऱ्यांना नोटिसा
सांगली : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पन्नास सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे़ यामुळे त्यांनी पशुधनाला देण्यात येणारे लसीकरण स्वीकारले नसल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत़ आठ दिवसांत त्यांच्याकडून खुलासा आला नाही, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे़ लसीकरण खोळंबल्याप्रकरणी जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती बैठकीतही वादळी चर्चा झाली़
जिल्ह्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांनी विविध मागण्यांसाठी दीड महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे़ अधिकाऱ्यांनी पशुधनासाठी शासनाकडून लसीकरण आले आहे़ परंतु, आंदोलनामुळे पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांनी लसीकरण स्वीकारले नाही़ यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी पशुधनाचे लसीकरण पावसाळा संपल्यानंतरही झाले नाही़ याविषयी शेतकऱ्यांतून जिल्हा परिषदेकडे तक्रारी आल्या होत्या़ म्हणूनच मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामावर हजर राहून लसीकरण करण्याची सूचना दिली होती़ तरीही सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पर्यवेक्षक कामावर हजर राहिले नाहीत़ म्हणून बुधवारी आंदोलनातील पन्नास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे़ आठ दिवसांत संबंधितांकडून खुलासा आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी ठेवली आहे़
दरम्यान, पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत पारे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी ८७ लाखांचा निधी मंजूर होता़ यापैकी १२ लाखांचा निधी शिल्लक राहिला असून, तो निधी दवाखान्यातील अंतर्गत सुविधांवर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला़ वांगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी तीस गुंठे जागा उपलब्ध झाली आहे़ या जागेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी २९ लाख निधीची तरतूद केल्याची माहिती पशुसंवर्धन समितीचे सभापती राजेंद्र माळी यांनी दिली़ (प्रतिनिधी)