बाजार समिती माजी संचालकांना नोटिसा

By Admin | Updated: June 13, 2015 00:18 IST2015-06-12T23:55:12+5:302015-06-13T00:18:22+5:30

प्रशासकांची कारवाई : आठ लाखाचा अतिरिक्त खर्च

Notices to former directors of the market committee | बाजार समिती माजी संचालकांना नोटिसा

बाजार समिती माजी संचालकांना नोटिसा

सांगली : चहापाणी व वाहन इंधन खर्चावर अतिरिक्त आठ लाख चार हजार रुपयांचा खर्च केल्याप्रकरणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा माजी संचालकांना शुक्रवारी प्रशासक मनोहर माळी यांनी पुन्हा नोटिसा बजावल्या. याची भरपाई न झाल्यास संबंधित माजी संचालक निवडणुकीस अपात्र ठरण्याची शक्यता असल्यामुळे खळबळ उडाली आहे.
२००८ - २०१३ दरम्यानच्या बारा संचालकांनी चहापाणी व नाष्ट्यावर व वाहनांच्या इंधन खर्चावर आठ लाख चार हजाराचा खर्च दाखवला आहे. याबाबत यापूर्वीही या संचालकांना प्रशासकांनी नोटिसा बजविल्या आहेत. काही जणांचा खुलासा समाधानकारक नाही, तर काही जणांनी खुलासा केलेला नाही. यासंदर्भात शुक्रवारी प्रशासक मनोहर माळी यांनी फेरनोटिसा बजावल्या आहेत. याबाबत तुमच्याविरोधात वसुलीची कारवाई का करण्यात येऊ नये? अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे.
नोटीस बजावलेले माजी संचालक कंसात, त्यांनी केलेला अतिरिक्त खर्च असा : विश्वनाथ कोळेकर (७० हजार), संभाजी पाटील (७० हजार), प्रकाश जमदाडे (२६ हजार), जगदेव कोळी (२१ हजार), बाळासाहेब बंडगर (७ हजार), भानुदास पाटील (२७ हजार), रमेश बिराजदार (१० हजार), भारत कुंडले (१७ हजार), संजय सावंत (११ हजार), संगीता नलवडे (३४ हजार) व भाग्यश्री पवार (१५ हजार).
यापूर्वी काही माजी संचालकांनी यासंदर्भात खुलासा केला होता. हा अतिरिक्त खर्च नसून अत्यावश्यक खर्च होता. त्यामुळे यातून आपणाला वगळण्यात यावे, असा खुलासा त्यांनी यापूर्वीच्या नोटिसीला दिला होता. यामुळे समाधान न झाल्याने पुन्हा प्रशासकांनी नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)


निवडणुकीसाठी अपात्र ठरण्याची शक्यता
माजी संचालकांनी आठ लाख ४ हजार अतिरिक्त खर्च केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. निवडणुकीपूर्वी हा अतिरिक्त खर्च संबंधितांनी भरला नाही तर ते निवडणूक लढवण्यास अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामुळे या नोटिसीने पुन्हा खळबळ उडाली आहे.

Web Title: Notices to former directors of the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.