जैववैद्यकीय कचराप्रकरणी दोन संस्थांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:52+5:302021-04-04T04:27:52+5:30
सांगली : गणेशनगर येथील महापालिकेच्या कचरा कंटेनरमध्ये जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) टाकल्या प्रकरणी महापालिकेने शनिवारी कचरा टाकणाऱ्या आदित्य डायग्नोस्टिक ...

जैववैद्यकीय कचराप्रकरणी दोन संस्थांना नोटिसा
सांगली : गणेशनगर येथील महापालिकेच्या कचरा कंटेनरमध्ये जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) टाकल्या प्रकरणी महापालिकेने शनिवारी कचरा टाकणाऱ्या आदित्य डायग्नोस्टिक आणि कचरा गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या सूर्या एजन्सीला कारवाईची नोटीस बजावली.
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी ही नोटीस बजावली आहे. यामध्ये कारवाई का करू नये, याबाबत ४८ तासांत खुलासा करावा, असे नमूद करण्यात आले आहे.
सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णालय तसेच अन्य आरोग्य सेवा देणाऱ्या आस्थापना यांच्याकडील बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठी महापालिकेने सूर्या एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत दवाखाने आणि मोठ्या हॉस्पिटलचा जैववैद्यकीय कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. शुक्रवारी आदित्य डायग्नोस्टिकमधील कचरा आणि वापरलेले पीपीई कीटस् गणेशनगर येथे टाकले जात असताना नागरिकांनी पाहिले. याप्रकरणी त्यांनी तक्रार केल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन आदित्य डायग्नोस्टिकला १ लाखाचा दंड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या भागाच्या स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे यांनी आदित्य डायग्नोस्टिककडून १ लाखाचा दंड वसूल केला आहे. याचबरोबर बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याबद्दल त्यांचा परवाना रद्द करण्याबाबतही महापौर सूर्यवंशी यांनी सूचित केले होते.
या घटनेची आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेतली. त्यानुसार नोटिसा देण्याचे आदेश आरोग्यधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानुसार ताटे यांनी आदित्य डायग्नोस्टिक आणि सूर्या एजन्सीला नोटीस बजावली आहे. आदित्य डायग्नोस्टिकच्या नोटिसीत बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकून घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे कारवाई का करू नये, असे म्हटले आहे, तर बायोमेडिकल कचरा गोळा करण्याची जबाबदारी असताना, त्यात कसूर केल्याबद्दल कारवाई का करू नये, अशी नोटीस सूर्या एजन्सीला बजावली आहे.