वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १८ जणांना निलंबनाची नोटीस
By Admin | Updated: June 7, 2014 00:15 IST2014-06-07T00:15:22+5:302014-06-07T00:15:43+5:30
प्रशासनाची कारवाई : तपासणीत तथ्य

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १८ जणांना निलंबनाची नोटीस
सांगली : जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने गुरुवारी सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बारा उपकेंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी केली. त्यात आठ आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि दहा आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माते मुख्यालयात वास्तव्य करीत नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी निलंबनाबाबत कारणे दाखवा नोटीस शुक्रवारी पाठविली. नोटिसीला उत्तर मिळाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्या सूचनेनुसार आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारती दळवी यांच्या पथकाने गुरुवारी अचानक भेटी देऊन आरोग्य केंद्रांची पाहणी केली. त्यात मिरज तालुक्यातील आरग, म्हैसाळ, मालगाव, तासगाव तालुक्यातील हातनूर, मांजर्डे, सावळज, वायफळे, वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील ढवळी, नरवाड, कर्नाळ, तर पलूस तालुक्यातील बांबवडे येथील आरोग्य सेवक, सेविका तेथेच रहात नाहीत. मळणगाव, अंजनीतील उपकेंद्राला टाळे ठोकल्याचे भरारी पथकाला आढळून आले. (प्रतिनिधी)