खासगी रुग्णालयांना नोटीस
By Admin | Updated: October 6, 2015 00:32 IST2015-10-05T23:42:25+5:302015-10-06T00:32:37+5:30
स्वाइनची धास्ती : महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित

खासगी रुग्णालयांना नोटीस
सांगली : स्वाइन फ्लूबाबत शहरातील खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती महापालिकेला प्राप्त होत नाही. त्यासाठी आता पालिकेच्या आरोग्य विभागाने ३५० खासगी रुग्णालयांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू केले आहे. महापौर विवेक कांबळे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची बैठक घेऊन, हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला. महापौर कांबळे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. महापालिका क्षेत्रात १७ स्वाइन फ्लूचे रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दहा स्वाइन फ्लूसदृश रूग्णांवर उपचार झाले आहेत.
महापालिका क्षेत्रात पहिला स्वाइन फ्लूचा रूग्ण तीन सप्टेंबरला आढळून आला. तो एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी गेला होता. मात्र संबंधित डॉक्टरांनी याची माहिती महापालिकेला दिली नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी केला. यामुळे आता महापालिका क्षेत्रातील ३५० खासगी रूग्णालयांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
माजी पदाधिकाऱ्याची मुलगी व पुतण्या संशयित
महापालिकेच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलीला व पुतण्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या रूग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही.
मृत महिलेस ‘स्वाइन’ची लागण
चार दिवसांपूर्वी मृत झालेल्या संजयनगर येथील सुनीता कोळपे या महिलेस ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाली होती, असा अहवाल शासकीय रुग्णालय प्रशासनास सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे, अशी माहिती स्वाइन फ्लू कक्ष अधिकारी सदाशिव व्हण्णणावर यांनी दिली.
चार दिवसात एकही नवीन रुग्ण नाही
गेल्या चार दिवसात एकही नव्याने संशयित रुग्ण दाखल झालेला नाही. याशिवाय गेल्या चार दिवसांपासून दाखल असलेल्या दोन रुग्णांच्या रक्त तपासणीचा अहवालही मिळाला आहे. यामध्ये इनामधामणी (ता. मिरज) व राजोबाचीवाडी (ता. जत) येथील दोन रुग्णांना स्वाइनची लागण झाली आहे.