जतच्या वैद्यकीय अधीक्षकांना नोटीस

By Admin | Updated: October 17, 2014 22:52 IST2014-10-17T21:42:13+5:302014-10-17T22:52:50+5:30

निवडणूक कामात हलगर्जीपणा : खुलाशाचे आदेश

Notice to the Joint Medical Superintendent | जतच्या वैद्यकीय अधीक्षकांना नोटीस

जतच्या वैद्यकीय अधीक्षकांना नोटीस

जत : विधानसभा निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्याबद्दल जत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी कारणे दाखवा नोटीस देऊन, त्यासंदर्भात त्वरित खुलासा करावा, असा आदेश दिला आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांत खळबळ माजली आहे.
१५ आॅक्टोबर रोजी मतदानात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय काळजी घेण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जत तहसील कार्यालय परिसरात डॉ. जगदीश गायकवाड यांच्यासह एक पथक व रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. मतपेट्या जमा करून घेण्याची प्रक्रिया १६ आॅक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती. परंतु १५ आॅक्टोबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान माडग्याळ येथून मतपेटी घेऊन आलेल्या एका कर्मचाऱ्यास चक्कर येऊन तो बेशुध्द पडला. त्यावेळी तेथे तैनात असलेले आरोग्य पथक व वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या वाहनातून बेशुध्द कर्मचाऱ्यास उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोणीही पूर्वसूचना न देता आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक तेथून रुग्णवाहिकेसह निघून गेले होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी पथकासह तेथे उपस्थित नव्हते. निवडणूक कामात त्यांनी हलगर्जीपणा केला, म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रभारी म्हणून काम करीत आहेत. त्यांना येथील कामाची जुजबी माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळापत्रक करणे, शासकीय पत्रव्यवहार आदी कामे संभाजी कोळी हे कर्मचारी करतात, तर अधीक्षक अरुण गणबावले आठवड्यातून एक दिवस येऊन सही करून परत जातात.
अधिकार नसताना कोळी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक केली होती. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे, असे मत येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)

जुजबी माहिती
यासंदर्भात डॉ. अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणूक कामासाठी नेमणूक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते तेथे उपस्थित नव्हते, अशी जुजबी माहिती त्यांनी दिली आहे.

Web Title: Notice to the Joint Medical Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.