जिल्हा बँकेला जीएसटी विभागाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:46+5:302021-05-09T04:27:46+5:30
सांगली : आटपाडी येथील माणगंगा कारखान्याचा लिलाव करण्यापूर्वी त्याची संपूर्ण जीएसटी रक्कम जमा करावी म्हणून केंद्रीय जीएसटी विभागाने जिल्हा ...

जिल्हा बँकेला जीएसटी विभागाची नोटीस
सांगली : आटपाडी येथील माणगंगा कारखान्याचा लिलाव करण्यापूर्वी त्याची संपूर्ण जीएसटी रक्कम जमा करावी म्हणून केंद्रीय जीएसटी विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस बजावली.
जिल्हा बँकेच्या मालकी हक्कात असलेला आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीस काढण्यात आला आहे. येत्या १० मेपर्यंत राज्यभरातून निविदा मागविण्यात आल्या असून, कारखान्याच्या सर्व मालमत्तांची एकूण मूलभूत विक्री किंमत ८२ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. कारखान्याकडे जिल्हा बँकेची १०६ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये इतकी थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी वर्षभरापूर्वी कारखान्याला ताबा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर माणगंगा कारखान्याकडील कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख, उपाध्यक्ष भगवानराव मोरे व संचालकांना मागणी नोटीस बजावली होती. वसुली न झाल्याने बँकेने कारखान्याच्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला आणि दोनदा लिलाव प्रक्रिया राबविली. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने हा कारखाना स्वत:च्या नावे केला आहे. या कारखान्याची मालकी आता जिल्हा बँकेकडे आहे. त्याची विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने केंद्रीय जीएसटी विभागाने बँकेला नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे थकबाकीपोटी दोन कोटी रुपये अधिक व्याज तसेच जीएसटी थकबाकीपोटी एक कोटी रुपये अधिक व्याज अशी रक्कम या कारखान्याकडून येणेबाकी आहे. या रकमेचा विचार लिलावावेळी करावा व केंद्र शासनाची रक्कम भरावी. त्याचबरोबर केंद्रीय जीएसटी विभागाने माणगंगा कारखान्यांच्या ३३ अचल मालमत्तांवर आपल्या बोजांची नोंद केली आहे. यामुळे जीएसटी विभागाचे देणे बँकेने विचारात घेणे आवश्यक आहे. जीएसटी कायद्यानुसार इतर दावेदारांपेक्षा प्राधान्याने प्रथम दावा जीएसटी विभागाचा राहील याची नोंद घ्यावी, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.