‘जनआरोग्य’चा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार रुग्णालयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:57+5:302021-05-18T04:27:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील चार रुग्णालयांना ...

Notice to four hospitals for refusing to provide public health benefits | ‘जनआरोग्य’चा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार रुग्णालयांना नोटिसा

‘जनआरोग्य’चा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार रुग्णालयांना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील चार रुग्णालयांना कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना लाभदायी असतानाही तांत्रिक कारण पुढे करून लाभापासून वंचित ठेवण्यात येत होते.

‘लोकमत’ने सोमवारीच ‘जनआरोग्य योजनेसाठी रुग्णालयांकडूनच खोडा, लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, दाखल लाभार्थी रुग्णांकडून पैशांचा परतावा न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर वेळेत उपचार मिळण्यासाठी व त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करताना अनेकजण मेटाकुटीला येत आहेत. दुर्बल घटकांची हीच अडचण ओळखून शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोनावरील उपचारास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ रुग्णालयांत कोविड उपचारावेळी योजनेचा लाभ घेता येतो. मात्र, अनेक खासगी रुग्णालयात योजनेचे बेड उपलब्ध नसल्याचे सांगून उपचार नाकारले जात आहेत. याबाबतच्या तक्रारीही वाढल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या निर्देशानंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील चार रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात करारानुसार सर्व रुग्णांवर उपचार करावेत अन्यथा आपल्याला मिळणारी रक्कम थांबविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कोविड उपचारामध्ये रुग्णालयास अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने अनेकांकडून रुग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. ‘नॉन कोविड’ आजारावरील उपचारास मात्र, रुग्णालये उत्सुक असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी अशा रुग्णालयांची माहिती संकलित करून पुढील कालावधीत योजनेच्या यादीतून वगळण्याबाबतच शिफारस करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

काही रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी पैसे घेतले जातात. योजनेतून पैशांचा परतावा आल्यानंतरही रुग्णांकडून घेतलेले पैसे दिले जात नाही. अशा रुग्णालयांवर आता फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

चौकट

या रुग्णालयांना नोटिसा

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यास कमी प्रतिसाद देणाऱ्या चार रुग्णालयांना ही नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यात मेहता रुग्णालय, वाळवेकर रुग्णालय (दोन्हीही सांगली), प्रकाश मेडिकल रुग्णालय (इस्लामपूर) आणि श्री सेवा रूग्णालय (आटपाडी) यांचा समावेश आहे.

Web Title: Notice to four hospitals for refusing to provide public health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.