हप्ते वसुलीप्रकरणी दोघांना नोटिसा
By Admin | Updated: September 4, 2015 22:38 IST2015-09-04T22:38:44+5:302015-09-04T22:38:44+5:30
तहसीलदारांची कारवाई : नायब तहसीलदार, चालक अडचणीत

हप्ते वसुलीप्रकरणी दोघांना नोटिसा
इस्लामपूर : शिये (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील वाळू वाहतूकदार कृष्णात धोंडिराम वरुटे यांच्याकडून पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून येथील निवासी नायब तहसीलदार विपीन लोकरे व तहसीलदारांच्या गाडीचे चालक वैभव चमकले यांना तहसीलदार सौ. रुपाली सरनोबत यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. कृष्णात वरुटे यांनी वाळू वाहतुकीचा व्यवसाय नव्यानेच सुरू केला आहे. ३१ आॅगस्टरोजी रात्री बाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येलूर (ता. वाळवा) गावच्या हद्दीत निवासी नायब तहसीलदार विपीन लोकरे व वाहनचालक वैभव चमकले यांनी ७0 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दुसऱ्याकडून पैसे घेऊन १0 हजार रुपये दोघांना दिले. मात्र जादा पैशाच्या लालसेपोटी त्यांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. जादा पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी ट्रकसह पोलीस ठाण्यात आणले. खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली, असे वरुटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.या प्रकाराविरोधात वरुटे यांनी दुसऱ्या दिवशी प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली. यावर संबंधित दोघे कोणाच्या आदेशावरुन कारवाईसाठी महामार्गावर गेले, याची सखोल चौकशी तहसीलदारांनी करावी असे आदेश देशमुख यांनी दिले. तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी सांगितले की, कसलीही परवानगी न घेता विपीन लोकरे व चालक वैभव चमकले यांनी शासकीय गाडी वापरुन वाळू वाहतूकदारांवर कारवाई का केली, याबाबत दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्या दिवशी आपण प्रशिक्षणासाठी बाहेरगावी होतो. (प्रतिनिधी)
वाळू वाहतूकदार कृष्णात वरुटे यांच्याकडून पैशांची मागणी
जादा पैशाच्या लालसेने वाहनांचा पाठलाग
पैसे देण्यास नकार दिल्याने ट्रकसह पोलीस ठाणे गाठले
तक्रार देण्याची दिली धमकी