पशुवैद्यकीय दवाखाने नव्हे, तर जनावरांचे कोंडवाडे?
By Admin | Updated: June 3, 2015 01:06 IST2015-06-03T00:15:54+5:302015-06-03T01:06:38+5:30
दयनीय अवस्था : जुन्या, गळक्या इमारतींमधून कारभार; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

पशुवैद्यकीय दवाखाने नव्हे, तर जनावरांचे कोंडवाडे?
गजानन पाटील- संख -ग्रामपंचायती, पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील ५ दवाखान्यांची दुरवस्था निर्माण झाली आहे. दवाखाना सुरू होऊन वीस वर्षांचा कालावधी होऊनसुद्धा तिकोंडी, उमराणी येथील दवाखाने आजही खासगी इमारतीत सुरू आहेत. एकाच खोलीमध्ये दवाखाने सुरू असल्याने त्यांना कोंडवाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, तर जत, बोर्गी, सोन्याळ येथे ५० वर्षांपासून जुन्या गळक्या इमारतीत कारभार सुरू आहे.
खिलारी व माडग्याळ मेंढीसाठी प्रसिद्ध असलेला जत तालुका आहे. जत, सोन्याळ, बोर्गी, आवंढी हे दवाखाने सर्वात जुने आहेत. आवंढी येथील दवाखान्याची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. जत, सोन्याळ, बोर्गी या दवाखान्यांचा कारभार आजही जुन्या इमारतीत सुरू आहे. जत येथील इमारत ही १९५० पूर्वीची आहे. श्रेणी-१ च्या दवाखान्याअंतर्गत शहराजवळील गावांचा समावेश आहे. पावसाळ्यात ही इमारत गळते. पुढच्या छाताचा गिलावा पडला आहे. पशुपालकांना स्वच्छतागृह, शौचालय, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. पशुसंवर्धन विभागाने सध्या नवीन सुसज्ज दवाखाना बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सुसज्ज दवाखाना उभारला जाणार आहे.
सोन्याळ दवाखान्याची इमारत १९५० पूर्वीची आहे. जाडरबोबलाद रस्त्याच्या दोन्ही बाजूला दवाखाना व डॉक्टर निवास अशा दोन इमारती आहेत. दवाखान्यासाठी चार खोल्या आहेत. त्यापैकी १ खोली सुस्थितीत आहे. बाकीच्या तीन खोल्या नादुरुस्त आहेत. त्या खोल्यांमध्ये दवाखान्याचे साहित्य आहे. उंदीर, घुशी, साप यांची वस्तीस्थाने आहेत.
डॉक्टर निवासासाठी दुसरी सिमेंट पत्र्याची इमारत आहे. इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे ८ वर्षांपासून येथे कोणीही रहात नाही. दवाखान्यासाठी जादा जागा नसल्यामुळे याच इमारतीचे निर्लेखन करून सुसज्ज दवाखाना बांधला जाणार आहे. बोर्गी येथे श्रेणी-१ चा सर्वात जुना दवाखाना आहे. इमारतीचे निर्लेखन करण्यात आले आहे. प्रारूप आराखडा करून इमारतीची दुरुस्ती केली जाणार आहे. कंपाऊंडचे बांधकाम सुरू आहे.
तिकोंडीत गेल्या २० वर्षांपासून खासगी इमारतीमध्ये दवाखाना सुरू आहे. पत्र्याची एक खोली आहे. तिथेच औषधे, रजिस्टर, इतर साहित्य ठेवले आहे. ना डॉक्टर, ना कर्मचाऱ्यांचे निवासस्थान. सुसज्ज दवाखान्यासाठी ग्रामपंचायतीने जागा दिली नाही.
उमराणी येथील दवाखानाही खासगी जागेतच सुरू आहे. दवाखाना बांधला होता. दवाखाना जागेचा कोर्ट मॅटर झाला आहे. तो वाद संपला असून, जागा उपलब्ध झाली आहे.