ठाण्याचा नव्हे, आता नोटिसांचा अंमलदार!
By Admin | Updated: December 2, 2014 00:14 IST2014-12-01T23:36:46+5:302014-12-02T00:14:27+5:30
कारवाईचे ‘टार्गेट’ : सांगली शहरात वाहनधारकांची पळवापळवी, प्रवासी वाहने रडारवर

ठाण्याचा नव्हे, आता नोटिसांचा अंमलदार!
सचिन लाड - सांगली -पोलीस ठाण्यात ‘अंमलदार’ म्हणून काम केलेल्या पोलिसांना आता ‘नोटिसांचा अंमलदार’ ही भूमिका रस्त्यावर उभे राहून बजवावी लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केला, असा आरोप ठेवून वाहनधारकांना विशेषत: प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांंवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून ही मोहीम सुरु आहे. कारवाईचे ‘टार्गेट’ दिल्याने ते पूर्ण करण्यासाठी पोलिसांकडून वाहनधारकांची एकप्रकारे पळवापळवी सुरु आहे.
वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतुकीची कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत सुरु रहावी, अपघात होऊ नयेत, असा हेतू ठेवून एक महिनाभर सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरु ठेवली जाणार आहे. सांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्रामबाग या पोलीस ठाण्यांसह वाहतूक शाखेतील पोलीसही कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिसाला पाच केसीस करण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सार्वजनिक ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणेसाठी सुरु असलेली कारवाईची ही मोहीम महिनाभर सुरु ठेवण्यात येणार आहे. यातूनही काहीच सुधारणा न झाल्यास मोहीम बंद केली जाणार आहे. या मोहिमेंतर्गतच्या कारवाईत न्यायालयातून दंड केला जात आहे. शंभर रुपयापासून पुढे दंडाची तरतूद आहे. मिळालेली नोटीस व न्यायालयाने ठोठावलेल्या दंडाची पावती वाहनधारकांना जपून ठेवावी लागत आहे. कारण दिवसभरात त्यांना दुसऱ्या एखाद्या पोलिसाकडून नोटीस मिळण्याची शक्यता असते. तसा प्रसंग आला, तर वाहनधारक ही नोटीस व दंड भरलेली पावती दाखवून स्वत:ची सुटका करुन घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कळविण्यात येते की...
आपणास या नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, ‘आपल्याविरुद्ध (संबंधित पोलीस ठाण्याचे नाव) भाग ६ गुन्हा रजिस्टर क्रमांक २०१४ भा. दं. वि. स. कलम २८३ प्रमाणे दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, आपल्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावयाचे आहे. तरी आपण (तारीख) सकाळी ११ वाजता न्यायालयात (संबंधित न्यायालयाचे नाव) बिनचूक हजर रहावे. यात कसूर करु नये.’ असा मजकूर असलेली नोटीस आहे. यावर ज्या पोलीस ठाण्याची नोटीस आहे, त्या ठाण्याचे नाव व पोलीस अंमलदार म्हणून सही केलेली आहे.
दंड अन्...कमाई शून्य
नोटीस दिलेल्या वाहनचालकांना पोलीस ठाण्यात बोलाविले जाते. कागदपत्रावर सह्या घेऊन पुन्हा न्यायालयात नेले जाते. तुम्हाला तासाभरात मोकळे करतो, असे पोलीस सांगतात. मात्र प्रत्यक्षात वाहनधारकांचा संपूर्ण दिवस जातो. न्यायालयात दंडही भरला जातो. यामुळे वाहनधारकांची दिवसभराची कमाई शून्य होते.