तानंगमध्ये दिसलेला बिबट्या नव्हे तरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:14+5:302021-06-20T04:19:14+5:30
कुपवाड : मिरज तालुक्यात तानंग-तासगाव रस्त्यावरील मानमोडी फाट्याजवळील ओढ्यावर शुक्रवारी रात्री बिबट्या दिसल्याच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते; ...

तानंगमध्ये दिसलेला बिबट्या नव्हे तरस
कुपवाड : मिरज तालुक्यात तानंग-तासगाव रस्त्यावरील मानमोडी फाट्याजवळील ओढ्यावर शुक्रवारी रात्री बिबट्या दिसल्याच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र पायाचे ठसे आणि विष्ठेवरून या भागात दिसलेला प्राणी बिबट्या नव्हे, तर तरस असल्याची माहिती वन विभागाने दिली. दरम्यान, खात्रीशीर माहिती नसताना बिबट्याबाबत पसरलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
तानंग-तासगाव रस्त्यावरील मानमोडी फाट्याजवळील ओढ्यावर शुक्रवारी रात्री तासगाववरून तानंगकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दुचाकीवरील दोघा जणांना बिबट्यासदृश प्राणी दिसला होता. त्यानंतर लगेचच तानंग हद्दीत बिबट्या शिरल्याची अफवा परिसरात पसरली होती. या अफवेने मानमोडी, सावळी, तानंग, कानडवाडी व कुपवाड एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. शनिवारी सकाळी पुन्हा सहायक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांसह पथकाने ज्या ठिकाणी बिबट्यासदृश प्राणी दिसला. त्या परिसराची पुन्हा पाहणी केली. यावेळी ओढा परिसरात आढळून आलेले प्राण्याच्या पायाचे ठसे व विष्टेवरून वन्यप्राणी हा बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, वन्य प्राण्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ यावर संपर्क साधावा, तसेच वन विभागाकडून खात्री न करता माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.
चौकट :
अफवांमुळे भीती...
तानंग परिसरात बिबट्या आल्याची अफवा शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी सोशल मीडियावर पसरली. तरस या प्राण्याच्या पायाचे ठसे असताना बिबट्याच्या पायाचा ठसा असल्याचे भासवले गेले. त्यामुळे बिबट्या आल्याची अफवा पसरली. अशा अफवांवर आणि चुकीच्या माहितीवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.