शासकीय वसतिगृह नव्हे, छळछावणीच!

By Admin | Updated: November 28, 2014 23:47 IST2014-11-28T22:44:09+5:302014-11-28T23:47:14+5:30

आटपाडीतील स्थिती : विद्यार्थी, पालकांत संताप

Not a government hostel, a persecution! | शासकीय वसतिगृह नव्हे, छळछावणीच!

शासकीय वसतिगृह नव्हे, छळछावणीच!

अविनाश बाड - आटपाडी तालुक्यात सध्या कुठेही पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू नसला तरी चार वर्षांपासून येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहात आठवड्यातून दोन वसतिगृहांसाठी एक टॅँकर मागविला जातो. वसतिगृहातील मुले-मुली पाण्यासाठी वसतिगृहाबाहेर भटकंती करत आहेत. गेले वर्षभर मुलांच्या ताटात भाजी दिलेली नाही. गावापासून तीन-चार कि. मी. दूर अंतरावर समाजकल्याण विभागाने तब्बल साडेसात कोटी रुपये खर्चून जणू वसतिगृहे नव्हे, तर छळछावण्याच बनविल्या आहेत.
माणगंगा साखर कारखान्याजवळ कौठुळी फाट्यावर समाजकल्याण विभागाने मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र दोन वसतिगृहांच्या आणि मुलींसाठी स्वतंत्र दोन वसतिगृहांच्या इमारती बांधल्या आहेत. वास्तविक तिथून फक्त जवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सगळी शाळा-महाविद्यालये आटपाडीत आहेत. मुलांच्या वसतिगृहाची क्षमता ८४ एवढी, तर मुलींसाठी ६४ मुली राहतील एवढी आहे. आता प्रत्यक्षात वसतिगृहात ६४ मुले, तर ५० मुली राहात आहेत. मात्र, मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये भिंत बांधलेली नाही. इमारती जवळ-जवळ आहेत. आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे राहात आहेत. संरक्षक भिंत नसल्याचा गैरफायदा काही टारगट मुले घेत असल्याची तक्रार आहे.
दोन वर्षांपूर्वी मुलींच्या वसतिगृहातील अधीक्षकाने ‘प्रताप’ केल्याने एका मुलीच्या नातेवाईकांनी त्याला प्रसाद दिला होता. तक्रारीनंतर मुलींच्या वसतिगृहात महिला अधीक्षिकेची नेमणूक करण्यात आली होती. मार्च महिन्यापासून एस. एस. थोरात हे एकच अधीक्षक दोन्हीही वसतिगृहांचा भार (?) सांभाळत आहेत. ते दोन्हीही वसतिगृहात अनेक दिवस हजरच नसतात.
पाण्याअभावी इथे स्वच्छतेचाही अभाव आहे. आठ दिवसांतून एकदा टॅँकर मागविला जातो. एक टॅँकर दोन वसतिगृहातील खाली उघड्यावर ठेवलेल्या टाक्यात सोडला जातो. तेच अंघोळीचे पाणी आणि पिण्याचेही पाणी. मुलांच्या अनेक तक्रारी आहेत. पण समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक कधी तपासणी करायला गेलेच नाहीत. मुलांच्या आणि मुलींच्याही वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. स्वयंपाक करणारे काही कर्मचारी व्यसनी आहेत.
अशा समस्यांच्या गर्तेत राहून मुले-मुली स्वत:चे करिअर घडविणार? हा प्रश्न आहे. शाळा-महाविद्यालयांपासून वसतिगृहापर्यंत तीन-चार कि. मी. रस्त्याने उन्हातान्हात पायपीट करून वसतिगृहात गेल्यावरही मुला-मुलींना अत्यंत कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.

गुंडालाच दिलाय जेवणाचा ठेका!
गेले वर्षभर मुलांना नियमानुसर जे तिथे फलकावर लिहिले आहे, त्याप्रमाणे जेवण दिले नाही. गेल्या १५ दिवसांपूर्वी जेवणाचा ठेकेदार बदलला आहे. मुंबईच्या एका कंपनीने ठेका घेतला असून आटपाडीच्या वसतिगृहाचा ठेका सांगलीतील एका गुंडाला दिल्याचे तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे फळे नासलेली आणि कुजक्या भाज्या पुरवल्या जात असल्या तरी, विद्यार्थ्यांना मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

Web Title: Not a government hostel, a persecution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.