‘त्या’ मका बियाणांची उगवणच नाही
By Admin | Updated: July 30, 2015 00:29 IST2015-07-29T23:44:44+5:302015-07-30T00:29:49+5:30
शेतकऱ्यांच्या तक्रारी : कृषी विभागाकडून कालबाह्य बियाणांचे वाटप

‘त्या’ मका बियाणांची उगवणच नाही
तासगाव : तासगाव तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून महिन्याभरापूर्वी खरीप हंगामासाठी मका बियाणांचे वाटप करण्यात आले होते; मात्र हे मका बियाणे कालबाह्य झाल्याचे नंतर उघडकीस आले होते. या बियाणांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला असून, अनेक ठिकाणी या बियाणांची उगवण झाली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रार केली असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
तासगाव तालुक्यात कृषी विभागाकडून कालबाह्य झालेल्या मका बियाणांचे वाटप करण्यात आले होते. परंतु नंतर हे बियाणे कालबाह्य असल्याचे निष्पन्न झाले. हे बियाणे कृषी विभागाकडून परतही घेण्यात आले नाही. काही निर्णय होईपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी याच बियाणांची पेरणीही केली होती; मात्र पेरणी केलेल्या क्षेत्रात बियाणांची उगवणच झाली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कालबाह्य बियाणांचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात काही प्रमाणात उगवण झालेली दिसून येतआहे. पण लागवडीचा खर्च निघणेही शक्य नाही. त्यामुळे हंगाम असेपर्यंतच तातडीने दुबार पेरणी करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिलेला नाही.
कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळेच शेतीचे नुकसान झाले असून, हे नुकसान भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)
‘लोकमत’चे वृत्त
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर महाबीजच्या ‘कुबेर’ या जातीच्या मका बियाणांचे वाटप मागील वर्षीच्या खरीप हंगामात करण्यात आले होते. तासगाव तालुक्याला दहा टन बियाणे वाटपासाठी देण्यात आले होते. त्यावेळी बहुतांश बियाणे शिल्लक राहिले होते. या खरीप हंगामात तालुका कृषी विभागाने शिल्लक असलेले बियाणे शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाटपही सुरू केले, मात्र हे बियाणे मुदत कालबाह्य झालेले होते. याबाबत ‘लोकमत’मधून बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी तासगावसह जिल्ह्यातील सर्व मका बियाणांचे वाटप थांबवण्याचे आदेश दिले होते. बातमीची दखल घेत महाबीजने हे बियाणे ताब्यात घेतले होते.
महाबीजच्या ‘कुबेर’ जातीच्या बियाणांची ७ जुलैला एक एकर क्षेत्रावर पेरणी केली होती. त्यानंतर आतापर्यंत पाणी पाजून, खतेही घातली आहेत. मात्र शेतात विरळ प्रमाणातच उगवण झाली आहे. त्यामुळे हे पीक असेच ठेवून परवडणारे नाही. दुबार पेरणी करावी लागणार आहे. कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मोठे आर्थिक़ नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दिलेली आहे.
- अमोल पाटील,
बस्तवडे, (ता. तासगाव)