जिल्हा बँकेसाठी पक्षांची अस्तित्वशून्य लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:42+5:302021-08-15T04:26:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरु झाली असतानाच राजकीय हालचालींना आता वेग आला ...

The non-existent battle of the parties for the District Bank | जिल्हा बँकेसाठी पक्षांची अस्तित्वशून्य लढाई

जिल्हा बँकेसाठी पक्षांची अस्तित्वशून्य लढाई

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरु झाली असतानाच राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही ही निवडणूक पॅनलद्वारे लढली जाणार असल्याने पक्षांचे अस्तित्व यात राहणार नाही. याशिवाय महाआघाडी म्हणून काँग्रेसला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी इच्छुक असल्याने काही ठिकाणचा अपवाद वगळता एकतर्फी निवडणूक होण्याचीही चिन्हे आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागील निवडणुकीत रयत विरुद्ध शेतकरी पॅनल अशी लढत झाली होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलने २१ पैकी १५ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. जागा वाटपात बिनसल्याने जयंत पाटील यांच्याशी फारकत घेत काँग्रेसने रयत पॅनल उभे केले होते. यात बहुतांश काँग्रेसचे लोक होते. जयंत पाटील यांच्या पॅनलमध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेस, भाजप, शिवसेनेचाही सहभाग होता.

राज्यात सध्या महाविकास आघाडी सत्तेत असल्याने स्थानिक पातळीवरही अशाप्रकारची आघाडी करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही जयंत पाटील यांच्याकडून काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून हे प्रयत्न यशस्वी झाले तर कदाचित त्यांच्या पॅनलसमोर दुसरे पॅनल उभारणे मुश्कील आहे. काहीठिकाणच्या इच्छुकांचे अपवाद वगळता एकतर्फी निवडणूक होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत निवडणुकीचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासून नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

चांगल्या प्रतिमेच्या लोकांना संधी

जिल्हा बँकेतील गेल्या सहा वर्षांचा व प्रशासकांच्या कालावधीचा अपवाद वगळता त्यापूर्वीच्या वीस वर्षांच्या काळात जिल्हा बँकेतील अनेक संचालकांचा कारभार वादग्रस्त ठरला. विविध घोटाळ्यांमध्ये संचालकांची नावे आली. अजूनही त्या चौकशा प्रलंबित आहेत. मागील सहा वर्षांप्रमाणेच पुढील कारभारही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी चांगल्या प्रतिमेचे लोक निवडण्याचे आव्हान नेत्यांसमोर असणार आहे. बँकेच्या प्रतिमेवर त्यांची प्रतिमा अवलंबून असल्याने त्यांचेही चांगल्या लोकांना प्राधान्य राहण्याची शक्यता आहे.

चौकट

काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व अधिक आहे. काही ठिकाणी भाजपचेही आहे. तरीही राष्ट्रवादी खालोखाल काँग्रेसची ताकद असल्याने त्यांच्या भूमिकेकडे राष्ट्रवादीचे लक्ष लागले आहे.

Web Title: The non-existent battle of the parties for the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.