इस्लामपुरात मंगळवारी ‘नो व्हेईकल डे’
By Admin | Updated: April 18, 2015 00:07 IST2015-04-17T23:15:27+5:302015-04-18T00:07:51+5:30
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून इस्लामपूर नगरपालिकेने आपल्या कार्याचा राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे.

इस्लामपुरात मंगळवारी ‘नो व्हेईकल डे’
इस्लामपूर : पर्यावरणाचा वाढता ऱ्हास व इंधन बचत याचा विचार करुन इस्लामपूर नगरपालिकेने आठवड्यातील एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी मंगळवार हा दिवस निश्चित करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. येत्या मंगळवारपासून (दि. २१ एप्रिल) याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
देशमुख म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून इस्लामपूर नगरपालिकेने आपल्या कार्याचा राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील व पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या सहकार्यातून विविध योजना मार्गी लागल्या आहेत.मंगळवार दि. २१ पासून पालिकेतील सर्व कर्मचारी ‘नो व्हेईकल डे’ पाळणार आहेत. पालिकेचे १७0 कर्मचारी यात सहभागी होतील. कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागानंतर शहरातील नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली. दरम्यान, इस्लामपूर नगरपालिकेच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. (वार्ताहर)