ना शाळा, ना परीक्षा; पाच लाख विद्यार्थी पास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:12+5:302021-06-22T04:19:12+5:30
सांगली : राज्य शासनाने पहिली ते बारावी वर्गातील पाच लाख ५६३ विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पास केले आहे. ...

ना शाळा, ना परीक्षा; पाच लाख विद्यार्थी पास !
सांगली : राज्य शासनाने पहिली ते बारावी वर्गातील पाच लाख ५६३ विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पास केले आहे. यापैकी शहरी भागातील काही जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळाले; पण जिल्हा परिषद शाळेतील मुले शाळेतच गेली नाहीत आणि ६० टक्के मुलांना ऑनलाइन शिक्षणही मिळाले नाही, यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल शिक्षण तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळासह अनेक दुर्गम भागांतील मुलांकडे आजही स्मार्ट फोन नाही. या विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या मुलांनी ऑनलाइन शिक्षण कसे घ्यायचे, असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे. शहरी भागातील मुलांना शाळांकडून ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. या शाळांनी मुलांच्या परीक्षाही ऑनलाइन घेतल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन शिक्षण देत आहेत; पण जिल्हा परिषदेतील ६० ते ७० टक्के मुलांनी दीड वर्षात शाळा आणि शिक्षकांचे तोंडच पाहिले नाही. गेल्या वर्षी पुस्तके तर मिळाली होती. या वर्षी पुस्तकेही मिळाली नाहीत. या मुलांचे शिक्षणच थांबले आहे. याकडे राज्य सरकार आणि अधिकारीही गांभीर्याने लक्ष देत नाहीत, अशी खंत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चौकट
जिल्हा परिषद शाळा : १६८८
महापालिका शाळा : ५०
खाजगी अनुदानित शाळा : १५२
खासगी विनाअनुदानित शाळा : २२२१
एकूण विद्यार्थी : ५००५६३
चौकट
कुठल्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली : ३९५२६
दुसरी : ४२६२७
तिसरी : ४३६५८
चौथी : ४३६१५
पाचवी : ४४४८३
सहावी : ४३५३६
सातवी : ४३६०२
आठवी : ४४०९५
नववी : ४५२७२
दहावी : ४२१७६
अकरावी : ३३३४९
बारावी : ३४६२४
चौकट
ऑनलाइन शिक्षण काळाची गरज : संजय ठिगळे
कोरोनाची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पालकही मुलांच्या सुरक्षित शिक्षणालाच प्राधान्य देणार आहेत. शास्त्र शाखा वगळता अन्य कला, वाणिज्य शाखा आणि प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात काहीच अडचण नाही. मुलांच्या सुरक्षेसाठी एक-दोन वर्षे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले, म्हणून फार मोठे नुकसान होणार नाही. ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज, म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ प्रा. संजय ठिगळे यांनी दिली.
चौकट
मुलगा काय शिक्षण घेतो हेच कळत नाही : सुषमा नायकवडी
सध्याच्या कोरोना कालावधीमध्ये ऑनलाइन शिक्षण थोड्या कालावधीसाठी योग्य आहे; पण कायमस्वरूपी ऑनलाइन शिक्षण देणे म्हणजे विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. विज्ञान शाखेतील मुलांचे ऑनलाइन प्रात्यक्षिक घेण्यात अडचणी येत आहेत. दोन-दोन वर्षे मुलांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यांना उत्तीर्ण करणे, त्या मुलांचे नुकसान होऊ शकते, असे मत क्रांतीसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांनी व्यक्त केले.
चौकट
इंटरनेट रेंजच मिळत नसल्याच्या तक्रारी
कोरोनामुळे सगळीकडे वर्क फ्रॉम होमसोबत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असणारी इंटरनेट सेवा योग्यप्रकारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अतिदुर्गम, दुर्गम भागात बीएसएनएल दूरध्वनी व मोबाइल टॉवरचे जाळे आहे. मात्र, काही वेळा ते विस्कळीत होत आहे. कारण, सध्या मोबाइल व इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण येथे जास्त आहे. शाळा, महाविद्यालयांचे अध्यापनही ऑनलाइन सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये मोबाइल आणि इंटरनेट रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून येत आहेत.