महापालिकेचे नवे मुख्यालय ३३ कोटींचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:46+5:302021-02-05T07:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेचे नवे मुख्यालय विजयनगर येथे होणार असून, त्यासाठी ३३ कोटी ३९ लाख रुपये खर्च ...

महापालिकेचे नवे मुख्यालय ३३ कोटींचे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेचे नवे मुख्यालय विजयनगर येथे होणार असून, त्यासाठी ३३ कोटी ३९ लाख रुपये खर्च होणार आहेत. या इमारतीच्या कामाची निविदा काढण्याच्या खर्चास मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीसमोर आला आहे. दि. ५ जानेवारी रोजी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर बऱ्याच वर्षांपासून रखडलेला नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. नव्या मुख्यालयासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेतला आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेसाठी स्वतंत्र, प्रशस्त अशी नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे. महापालिकेची सध्याच्या इमारतीची जागा कमी पडत आहे. तसेच विविध विभागांची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी विजयनगर येथील सुमारे अडीच एकर जागेत महापालिकेची नवी इमारत उभारण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला. नव्या मुख्यालयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
आता या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीसमोर आला आहे. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रातील खोकी पुनर्वसनाचा विषयही बरेच वर्ष प्रलंबित आहे. तोही आता मार्गी लागणार असून, याबाबतचे प्रस्ताव सभेत आणण्यात आले आहेत. १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून नाला बांधकाम व अन्य कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सभेसमोर आणण्यात आले आहेत.
चौकट
सर्व विभाग एकाच छताखाली
महापालिकेचे नवे मुख्यालय सहा मजली असेल. अडीच एकर जागेवर एक लाख चौरस फुटाच्या बांधकाम होणार आहे. या ठिकाणी सर्व विभाग असणार आहेत तसेच तळ मजल्यावर पार्किंग करण्यात येणार आहे. ही इमारत सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहे. तीन वर्षात ही इमारत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.