अमृत योजनेसाठी अखेर महापालिका झाली जागी
By Admin | Updated: September 3, 2015 23:35 IST2015-09-03T23:35:39+5:302015-09-03T23:35:39+5:30
दोनशे कोटींचा प्रस्ताव : शनिवारी शासनाकडे सादर करणार

अमृत योजनेसाठी अखेर महापालिका झाली जागी
सांगली : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीत पात्र ठरू न शकलेल्या सांगली महापालिकेने आता अमृत योजनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेली महिनाभर केवळ अमृत योजनेची चर्चाच प्रशासन स्तरावर झाली. अखेर नगरविकास खात्यातून दूरध्वनी आल्यानंतर गुरुवारी प्रशासन व पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. शनिवार दि. ५ सप्टेंबरपर्यंत अमृत योजनेसाठी कृती आराखडा सादर करावा लागणार असल्याने अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार दोनशे ते अडीचशे कोटीचा आराखडा तयार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र शासनाच्या अमृत योजनेत सांगली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील इतर महापालिकांनी अमृत योजनेसाठी पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असताना, सांगलीत मात्र याबाबत शांतता होती. गुरुवारी नगरविकास खात्यातून महापालिकेला दूरध्वनी आला. शनिवारपर्यंत कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर गटनेते किशोर जामदार यांनी महापौर विवेक कांबळे यांच्याशी चर्चा करून तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. दुपारनंतर पाणी पुरवठा, ड्रेनेज, उद्याने, आरोग्य या विभागातील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. (प्रतिनिधी)
जुनेच प्रस्ताव नव्याने होणार सादर...
योजनेत सध्याच्या अपूर्ण पाणी, ड्रेनेज योजनेसाठी निधीची मागणी केली जाणार आहे. त्याशिवाय उद्याने विकास, पावसाळी पाण्याचा निचरा आदी गोष्टींसाठी आराखडा तयार केला जाईल. एकूण पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करून निधीची मागणी होणार आहे. महापालिकेने दोनशे ते अडीचशे कोटीचा आराखडा तयार करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या दोन दिवसांत जुनेच प्रस्ताव नव्याने सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.