महापालिकेचा अर्थसंकल्प ४० कोटींनी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:01+5:302021-03-31T04:27:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या २०२१-२२ चा अर्थसंकल्प बुधवारी विशेष ऑनलाइन सभेत सादर करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे ...

महापालिकेचा अर्थसंकल्प ४० कोटींनी वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या २०२१-२२ चा अर्थसंकल्प बुधवारी विशेष ऑनलाइन सभेत सादर करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे हा अर्थसंकल्प महासभेकडे सादर करतील. आयुक्तांच्या अर्थसंकल्पात सुमारे ४० कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची ऑनलाइन सभा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होत आहे. कोराेनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. गेले वर्षभर महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. पाणीपट्टी, घरपट्टी यासह अन्य करांची वसुलीही कमी झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. एलबीटीपोटी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचे पगार व अन्य बांधील खर्च सुरू आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलेल्या आर्थिक नियोजनामुळे उत्पन्न घटल्यानंतरही महापालिकेचा कारभार सुरळीत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांची वसुली सुरू केली आहे. त्यामुळे मार्च अखेरीस महापालिकेच्या आर्थिक स्थितीत काहीशी सुधारणा होणार आहे.
आयुक्त कापडणीस यांनी स्थायी समितीला ७१० कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना यात कोणत्याही नवीन योजनांचा समावेश न करता वास्तवदर्शी अर्थसंकल्प केला होता. वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीकडूनही हीच अपेक्षा आहे. मात्र स्थायी समितीचा अर्थसंकल्प प्रशासनापेक्षा किमान ४० ते ५० कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. यात काही राजकीय घोषणांना निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक नगरसेवकाला प्रभागात विकासकामांसाठी जादा निधी, जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपात ज्यांची कामे धरली नाही अशा नगरसेवकांवर स्थायी समिती जास्त मेहरनजर दाखवण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीही अर्थसंकल्पात निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समितीचा अर्थसंकल्प प्रशासनापेक्षा वाढणार आहे.
चौकट
ऑनलाइन सभेबाबत भाजपची भूमिका काय?
महापालिकेच्या महासभा ऑफलाइन घेण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यासाठी २६ मार्चच्या सभेत भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. सभा बंद पाडण्याचाही प्रयत्न केला होता. आता अर्थसंकल्पीय महासभाही ऑनलाइनच होणार आहे. त्यात भाजपचे स्थायी समिती सभापती पाडुरंग कोरे हे अर्थसंकल्प ऑनलाइन सादर करणार आहेत. त्यामुळे आता या ऑनलाइन सभेबाबत भाजपची भूमिका काय राहणार, याची उत्सुकता आहे.