राष्ट्रवादीच्या निवडणुकीत निरुत्साही वारे
By Admin | Updated: April 2, 2015 00:38 IST2015-04-01T23:47:35+5:302015-04-02T00:38:31+5:30
नाराजीचा सूर : पक्षांतर्गत कुरघोड्या; आबांच्या निधनामुळे फटका

राष्ट्रवादीच्या निवडणुकीत निरुत्साही वारे
सांगली : राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणुकांचा मौसम आला असताना, सांगली जिल्ह्यात निरुत्साही वारे वाहू लागले आहे. पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे एकीकडे नेते, कार्यकर्ते खचले आहेत, तर दुसरीकडे आर. आर. पाटील यांच्या निधनाचाही मोठा फटका या निवडणुकांना बसत आहे. येत्या ५ आणि १२ एप्रिल रोजी विविध पदांसाठी निवडणुका होणार असतानाही पदे मिळविण्यासाठी फारसा उत्साह दिसत नाही. कार्यालयातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दीही घटली आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी, गेल्या काही वर्षांत पक्षाची अधोगती सुरू आहे. महापालिका, विधानसभा अशा महत्त्वाच्या निवडणुकांबरोबरच राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या गावांमधील छोट्या सोसायट्यांच्या निवडणुकातही पक्षाला मोठा फटका बसला आहे. पदांसाठी पूर्वी राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी होत होती. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की पक्षीय कार्यालयात हालचालींना वेग येत होता. इच्छुकांच्या नेत्यांच्या दरबारी फेऱ्या होत असत. आता असे कोणतेही चित्र दिसत नाही. लोकसभा निवडणुकीपासून पक्षातील उत्साहाला अनेक कारणांनी ओहोटी लागली. ती अजूनही कायम आहे. पुन्हा भरती येईल, याचीही चिन्हे कोणाला दिसत नाहीत.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातील अर्धा डझन नेते भाजप व शिवसेनेत निघून गेले. त्यांच्या जागी सक्षम नेतृत्व उभे करण्यात पक्षाला यश आले नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादीला उसने उमेदवार घ्यावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीत या गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या. नेत्यांबरोबर कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर निघून गेले. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची संख्या घटली. दुसरीकडे पक्षांतर्गत कुरघोड्या वाढल्याने अनेक प्रामाणिक कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले.
या नाराजीतून त्यांनी पक्षीय कार्यालयात येणे बंद केले. आजही जिल्ह्यातील, शहरातील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी पक्षीय कार्यालयात दिसत नाहीत. महत्त्वाच्या बैठकांनाही त्यांनी गैरहजेरी असते. त्यामुळे निवडणुकांमध्ये म्हणावा तेवढा उत्साह दिसत नाही. (प्रतिनिधी)
निवडणुकीचा कार्यक्रम
५ एप्रिलरोजी विधानसभानिहाय तसेच तालुका व ब्लॉक कार्यकारिणी अध्यक्ष, अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत.
१२ एप्रिल रोजी प्राथमिक समिती, पंचायत, जिल्हा, शहर, तालुका, मतदारसंघनिहाय अध्यक्ष, तसेच प्रदेश कार्यकारिणीवर पाठविण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.
आबांच्या निधनाचा धक्का
आर. आर. पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे एक सक्षम नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने अनेक कार्यकर्ते खचले. प्रत्येक तालुक्यात त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत. आबांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही हे कार्यकर्ते सावरलेले नाहीत. आबा नसतील तर, पद घेऊन काय करायचे, असा सवाल कार्यकर्तेच उपस्थित करीत आहेत.