निर्धार संघटनेने केला महापालिका शाळेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:23+5:302021-02-05T07:24:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संपूर्ण महापालिका क्षेत्रात गेली १ हजारहून अधिक दिवस अखंडित स्वच्छता अभियान राबविणाऱ्या सांगलीतील निर्धार ...

निर्धार संघटनेने केला महापालिका शाळेचा कायापालट
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संपूर्ण महापालिका क्षेत्रात गेली १ हजारहून अधिक दिवस अखंडित स्वच्छता अभियान राबविणाऱ्या सांगलीतील निर्धार संघटनेने आणखी एका उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या एका दत्तक शाळेचा कायापालट केला. शैक्षणिक माहितीफलकांसह शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणांची ओळख करुन देणारे फलकही याठिकाणी लावून एका नवा प्रयोग संघटनेने केला आहे.
शाळेचा केलेला कायापालट पाहून नागरिकांतून कौतुक होत आहे. आमदार सुधीर गाडगीळ व महापौर गीता सुतार यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन कौतुक केले.
काळवंडलेल्या भिंती, अस्वच्छ आवार, मोडकळीस आलेले दरवाजे, प्रवेशद्वार अशा प्रकारचे चित्र बहुतांश महापालिका शाळांचे दिसून येते.
वर्षानुवर्षे या शाळा दुर्लक्षितच आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत त्यांची दुरवस्था पालकांना पहावली नसल्याने त्यांनी या शाळांकडे पाठ फिरवली. यामुळेच शहरातील कित्येक शाळा बंद पडल्या आहेत. काही शाळा त्या वाटेवर आहेत. अशातच सांगली शहर स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या निर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी महापालिका शाळा क्रमांक ७ दत्तक घेऊन शाळेचा लोकसहभागातून कायापालट केला आहे. शाळेची आतून, बाहेरून रंगरंगोटी तसेच वर्गखोल्या, तसेच बोलक्या भिंती साकारण्याचे काम अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने केले.
राकेश दड्डणावर म्हणाले की, एकदा शाळेमध्ये स्वच्छतेसाठी गेल्यानंतर शाळेची दुरवस्था पाहून वाईट वाटले. शाळेत विद्यार्थ्यांचा पट इतर महापालिका शाळेच्या तुलनेत चांगला होता. त्यामुळे आम्ही ही शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला व सुरुवातीच्या टप्प्यात संपूर्ण शाळेची साफसफाई करून घेतली. त्यानंतर संपूर्ण शाळेचे रंगकाम केले. वर्गखोल्यामधील भिंतींवर शालेय अभ्यासक्रम, सामाजिक संदेश, चित्रे, सांगलीचे तैलचित्र रेखाटले आहेत. यासाठी स्थानिक कारागीर व दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले. एक आदर्श शाळा बनविण्याचा आमचा निर्धार आहे.
महापौर सुतार म्हणाल्या की, राकेश व त्यांच्या टीमचे कार्य अभिनंदनीय असून पुढील काळात महानगरपालिकेकडून शाळाांसाठी सर्वतोपरी सहकार्य करु. उपायुक्त राहुल रोकडे म्हणाले की, हे कार्य दखलपात्र असून यातून नव्या शैक्षणिक उपक्रमाला सुरुवात झाली आहे. स्थायी सभापती पांडुरंग कोरे, सभागृह नेते विनायक सिंहासने आदींनी या कामाचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक संजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, गुराण्णा बंगले, सचिन भोसले, प्रतिभा गडदे आदी उपस्थित होते.