विद्यार्थिनींसह नऊ जखमी

By Admin | Updated: December 2, 2014 23:21 IST2014-12-02T22:20:46+5:302014-12-02T23:21:21+5:30

बुधगावजवळ तिहेरी अपघात : एसटी बसची ट्रॅक्टर, दुचाकीला धडक

Nine injured along with students | विद्यार्थिनींसह नऊ जखमी

विद्यार्थिनींसह नऊ जखमी

सांगली : एसटी बस, ट्रॅक्टर-ट्रॉली व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या तिहेरी अपघातात बसमधील आठ विद्यार्थिनी व चालक असे नऊजण जखमी झाले. बुधगाव (ता. मिरज) येथील स्मशानभूमीजवळ वळण घेण्याच्या मार्गावर आज, मंगळवार सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला. जखमी विद्यार्थिनी कुमठे (ता. तासगाव) येथील आहेत.
जखमींमध्ये ज्योती रघुनाथ घाटगे (वय १९), सुधाताई रणधीर पाटील (१९), उज्वला बाळासाहेब पाटील (१८), प्राजक्ता राजेंद्र भोसले (१७), पूनम उत्तम भोसले (१८), शैलजा रघुनाथ गावडे (१९), तेजश्री सुभाष पाटील (२०, सर्व रा. कुमठे, ता. तासगाव), सोनाली चंद्रकांत पाटील (२०, करोली-एम, ता. कवठेमहांकाळ) व एसटी बसचा चालक शरद चंद्रकांत पाटील (३४, वाळवा) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच जखमी मुलींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
एसटी बस (क्र. एमएच १२ सीएच ७९३६) घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथून सांगलीला येत होती. ट्रॅक्टर-ट्रॉली (क्र. एमएच १० एस ४६०४) माधवनगरहून बुधगावला येत होती, तर दुचाकीस्वार (क्र. एमएच १० टी ५२१४) बुधगावहून माधवनगरला निघाला होता. बुधगावच्या स्मशानभूमीजवळ वळण घेताना एसटीचा अचानक अ‍ॅक्सिलेटर तुटल्याने चालक शरद पाटील यांचा ताबा सुटला. त्यावेळी ट्रॅक्टर-ट्रॉली समोरून येत होती. यामुळे एसटीची ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की, ट्रॅक्टर व ट्रॉली बाजूला होऊन रस्त्याकडे असलेल्या घराच्या भिंतीवर जाऊन आदळली. यादरम्यान दुचाकीस्वारासह एसटीची धडक बसली.
या अपघातात एसटीमधील आठ विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्या सांगलीतील महाविद्यालयात शिक्षण घेतात. कुमठ्यात त्या सकाळी साडेआठला एसटीत बसल्या होत्या. ट्रॅक्टरचा चालक व दुचाकीस्वारास कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे बिसूर रस्त्यामार्गे बुधगाव गावातून पर्यायी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. सांगली ग्रामीण पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. (प्रतिनिधी)

जीव धोक्यात
बुधगावच्या स्मशानभूमीपासून ते माने गल्लीच्या कॉर्नरपर्यंत रस्त्याकडेला घरांची रांग लागलेली आहे. रस्त्याला लागून असलेल्या या घरातील अनेक कुटुंबांचे मृत्यूच्या छायेत वास्तव्य आहे. रात्रीच्यावेळी अपघात होऊन वाहन घरात शिरले तर, मोठी घटना घडू शकते. यापूर्वी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी अनेकांचे बळी गेले आहेत. रहिवाशांच्या जीविताला धोका असल्याचे चित्र आहे.

Web Title: Nine injured along with students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.